आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये साऊथ आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक हा धमाकेदार कामगिरी करत आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याने एकूण चार शतके ठोकली आहेत. बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने दमदार शतकी खेळी केली. या सामन्यात त्याने 116 चेंडूत 114 धावांची खेळी केली. यात दहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या शतकासह त्याने एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक चार शतके ठोकण्याचा कुमार संघकारा याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
क्विंटन डिकॉक ने 2023 विश्वचषकात आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने एकाच स्पर्धेत सर्वाधिक पाच शतके ठोकली आहेत. क्विंटन डिकॉकने पुढच्या सामन्यात शतक ठोकले तर तो रोहितच्या विक्रमाशी बरोबरी करू शकेल.
दक्षिण आफ्रिकेचे अजून दोन साखळी सामने बाकी आहेत. तसेच हा संघ फायनलमध्ये पोहोचला तर त्यांना आणखीन दोन सामने खेळायला मिळतात. चार सामन्यात दोन शतके त्याने ठोकली तर रोहित शर्माला तो पाठीमागे टाकू शकतो.
क्विंटन डिकॉकचे हे एकदिवसीय क्रिकेटमधले 21 वे शतक ठरले. तसेच भारत देशातले त्याचे हे सहावे शतक आहे. वनडे क्रिकेट मधील 152 सामन्यांमध्ये त्याने 6,721 धावा केल्या आहेत. हे त्याचे शेवटचे विश्वचषक असून स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होणार आहे. याची घोषणा त्याने विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच केली होती.
वनडे विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू
रोहित शर्मा- 5 (2019 विश्वचषक)
कुमार संगकारा- 4 (2015 विश्वचषक)
क्विंटन डी कॉक- 4 (2023 विश्वचषक)
सौरव गांगुली- 3 (2003 विश्वचषक)
मॅथ्यू हेडन- 3 (2007 विश्वचषक)
मार्क वॉ – 3 (1996 विश्वचषक)