भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली असली तरी कसोटी क्रिकेटमध्ये तो आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळू शकलेला नाहीये.
भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. यासह २-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना उद्यापासून इंदोरच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
आकाश चोपडाने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विराट कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तो म्हणाला की, “विराट कोहलीच्या मोठ्या खेळीची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ती खेळी लवकरच येणार अशी आशा आहे. विराट कोहलीची गेल्या १२-१३ कसोटी डावातील सर्वोच्च धावसंख्या ४४ धावा आहे. त्याने खूप आत्मविश्वास दाखवला आहे आणि कधी-कधी त्याला वाटले आहे की तो एक मोठी खेळी खेळेल पण आतापर्यंत ती मोठी खेळी आलेली नाही. शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही तो चांगली फलंदाजी करत होता पण दुसऱ्या डावात तो लवकर बाद झाला.”

तसेच तो पुढे म्हणाला की,”चेतेश्वर पुजाराकडूनही धावा अपेक्षित आहेत. मी श्रेयस अय्यरवर टीका करणार नाही कारण तो अनलकी राहिला होता. पण भारताला त्यांच्या टॉप-५ फलंदाजांकडून धावांची गरज आहे. रोहित शर्माशिवाय इतर खेळाडूंनाही धावांची गरज आहे.”