नुकताच पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत शुभमन गिल हिट ठरला. मात्र संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) धावा करण्यात अपयशी ठरला. त्याला या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. इंदूर वनडे सामन्यात देखील तो स्वस्तात माघारी परतला. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने विराट कोहलीच्या फलंदाजी बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
इंदूर वनडे सामन्यात विराट कोहलीने २७ चेंडूंचा सामना करत ३६ धावांची खेळी केली. तो वेगाने धावा करत होता. असे वाटत होते की, या डावात तो शतक पूर्ण करेल. मात्र त्याला ३६ धावांवर माघारी परतावे लागले. याबाबत बोलताना आकाश चोप्राने म्हटले की, जेव्हा विराटने ४६ वे शतक पूर्ण केले त्यावेळी असे वाटत होते की,तो प्रत्येक सामन्यात शतक झळकावणार मात्र असे काहीच झाले नाही.
विराट कोहली प्रत्येक सामन्यात शतक झळकवू शकत नाही..
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्राने म्हटले की, ” विराट कोहलीची बॅट या मालिकेत तळपली नाही. ४६ वे शतक झळकावल्यानंतर असे वाटत होते की,तो प्रत्येक सामन्यात शतक झळकावणार. मात्र असे काहीच झाले नाही. सर्वांना हे लक्षात असायला हवं की, हा आंतरराष्ट्रीय सामना आहे. इथे प्रत्येक सामन्यात शतक झळकावणं सोपं नसतं.”
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने ९० धावांनी विजय मिळवला. ही मालिका भारतीय संघाने ३-० ने आपल्या नावावर केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटक अखेर ९ बाद ३८५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव २९५ धावांवर संपुष्टात आला.