‘भारतीय संघात काही संधी मिळेना..’ आता अजिंक्य रहाणे खेळणार ‘या’ देशासाठी..

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे हा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करताना दिसून येतोय. काही महिन्यांपूर्वी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले होते. तेव्हापासून तो पुनरागमन करण्याची वाट पाहतोय. येत्या ९ फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी देखील अजिंक्य रहाणेला संघात स्थान देण्यात आले नाहीये. त्यामुळे आता अजिंक्य रहाणे इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत तो लीसेस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
लीसेस्टरशायर संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, आयपीएल २०२३ स्पर्धा झाल्यानंतर, जून महिन्यात अजिंक्य रहाणे काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत लीसेस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अजिंक्य रहाणे भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण १९२ सामने खेळले आहेत. तसेच गेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात अजिंक्य रहाणेने मोलाची भूमिका बजावली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने आपल्या नावावर केली होती.
हे ही वाचा..
‘शाहीन समोर बुमराह काहीच नाही..’ पाकिस्तानी दिग्गजाचे बुमराह बद्दल वादग्रस्त वक्तव्य