आयपीएल 2024 च्या रणसंग्रामात या खेळाडूंवर असेल साऱ्याच्या नजरा; केकेआरला असेल कंगारू खेळाडू कडून आशा

0

आयपीएल 2024 च्या रणसंग्रामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. जवळपास दोन महिन्याहून अधिक वेळ चालणाऱ्या या लीग विषयी क्रीडा प्रेमींची प्रचंड उत्सुकता शिगेला पोचली आहे. लीग मधील काही संघांनी भली मोठी रक्कम देऊन खेळाडूंना आपल्या संघामध्ये सामील करत संघ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक रकमा देऊन खरेदी केलेले खेळाडू अचानक चर्चेत आले आहेत. याच खेळाडूंवर आता साऱ्यांच्या नजरा असतील. कोण आहेत ते खेळाडू चला तर जाणून घेऊयात.

आयपीएल 2024 मधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क ठरला आहे. त्याला केकेआरने 24.75 कोटी रुपये देऊन खरेदी केले आहे. आयपीएलच्या इतिहासातला तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. एक तर तो सर्वात महागडा खेळाडू आणि दुसरीकडे आठ वर्षानंतर संघात परत येऊन चांगली कामगिरी करण्याचा दबाव त्याच्यावर असणार आहे. स्टार्ककडे भारतात खेळण्याचा अनुभव असल्याने त्याच्या या अनुभवाचा फायदा केकेआरच्या संघाला होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 20.50 कोटी रुपये देऊन आपल्या संघामध्ये सामील करून घेतले आहेत. हैदराबादच्या संघाला त्याच्याकडून प्रचंड अशा अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे संघ व्यवस्थापनाने संघाच्या नेतृत्वाची धुरा देखील त्याच्याकडे सोपवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीचा धाक निर्माण करणाऱ्या या खेळाडूला आयपीएल मध्ये प्रभावी कामगिरी करता आली नाही. भारतात 2023 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

चेन्नई सुपर किंग्सने अनकॅप्ड खेळाडू समीर रजवी 8.40 कोटी रुपये देऊन आपल्या गोटात सामील करून घेतले. तो सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. डाव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू सुरेश रैना सारखा फलंदाजी करतो.

भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याचा 2022 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे 2023 च्या आयपीएलला तो मुकला होता. 2024 च्या आयपीएल लीगमध्ये साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर असतील. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पांड्या यंदा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. 2022 मध्ये गुजरात टायटनच्या संघाला त्याने विजेतेपद पटकावून दिले होते.तो यंदा कशी कामगिरी करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र याला सीएसकेने आपल्या संघामध्ये घेतले आहे. 2023 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती.

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने 2023 च्या आयपीएल स्पर्धेमध्ये 625 धावा केल्या होत्या. तो सध्या जबरदस्त फॉर्मत आहे.  नुकतेच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याने 700 हून अधिक धावा केल्या आहेत.

युवा स्टार खेळाडू रिंकू सिंग याने मागील वर्षी यश दयाच्या चेंडूवर सलग पाच षटकार ठोकून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदा देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मागील वर्षाच्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय टी-ट्वेंटी संघामध्ये देखील स्थान मिळवले आहे.

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- IPL 2024: जाणून घ्या मुंबई इंडियन्सची तिकिटे बुक कशी करायची ?

 

हे ही वाचा:- अनेक वेळा अवघ्या 1 धावांमुळे हुकले या दिग्गज खेळाडूंचे शतक, सर्वात जास्त 99 धावांवर बाद झालेले दिग्गज फलंदाज

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.