अर्जभारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा सुरू आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सामने पार पडत आहेत. युवा खेळाडू जोरदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. तसेच काही अनुभवी खेळाडू देखील भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. या हंगामात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतोय.
या स्पर्धेत गोवा विरुध्द छत्तीसगढ या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात गोवा संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना हवी तशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यातील दोन्ही डावात त्याने १४ षटके गोलंदाजी केली. मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
गोलंदाजी केल्यानंतर ज्यावेळी अर्जुन तेंडुलकर फलंदाजीला आला, त्यावेळी त्याने राहुल द्रविडच्या फलंदाजीची आठवण करून दिली आहे. ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अर्जुनने ६२ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ४३ निर्धाव चेंडू खेळून काढले. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि वर्तमान भारतीय संघातील मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील भिंत म्हणून उभे राहायचे.
अर्जुन तेंडुलकर आगामी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या हंगामात त्याला मुंबई इंडियन्स संघासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र आगामी हंगामात अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स संघासाठी पदार्पण करावं अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केली आहे.