पुणे: महिलांच्या पात्रता
फुटबॉल स्पर्धेत अस्पायर एफसीची दोन विजयाची मालिका गतविजेत्या पीआयएफए संघाने रोखली. मुंबईत कुपरेज मैदानावर झालेल्या सामन्यात पीआयएफने अस्पायरचा 4-0 असा पराभव केला.
सलग दोन विजयानंतर अस्पायरचा पात्रता फेरीतील हा पहिलाच पराभव ठरला. पहिल्या सामन्यात त्यांनी लॉलेस युनायटेडचा 4-0 आणि दुसऱ्या सामन्यात फटबॉल स्कूल इंडियाचा 7-0 असा पराभव केला होता.
अस्पायर आणि
पीआयएफए या अपराजित संघातील सामन्यात अस्पायरने सुरवात चांगली केली होती. पण, त्यांच्या बचावातील त्रुटींचा फटका त्यांना बसला. पीआयएफए संघाने याचाच फायदा उचलला. लागोपाठ दोन गोल करून त्यांनी अस्पायरवर दडपण टाकले. प्रथम 15व्या मिनिटाला सस्मिता बेहेरा आणि नंतर 16व्या मिनिटाला आकांक्षा कोंढाळकरने गोल केला. पूर्वार्ध संपता संपता 42व्या मिनिटाला सस्मिताने वैयक्तिक दुसरा गोल करून संघाची आघाडी मध्यंतराला 3-0 अशी भक्कम केली. उत्तरार्धात सुरवातीलाच त्यांना गोल करण्याची संधी मिळाली. सामन्याच्या 52व्या मिनिटाला आकांक्षाने हा गोल करून संघाची आघाडी भक्कम केली. त्यानंतर बचाव भक्कम राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.