ऑस्ट्रेलियाने रविवारी सहाव्यांदा ICC टी -२० महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. केपटाऊनमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा १९ धावांनी पराभव केला आहे. सलामीवीर बेथ मुनीच्या (नाबाद ७४) शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकअखेर ६ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला ६ गडी गमावून केवळ १३७ धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५७ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना लॉरा वॉलवॉर्टनेने ६१ धावांची खेळी केली. मात्र ती १७ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतली.
ऑस्ट्रेलियाने दिले १५७ धावांचे आव्हान…
सलामीवीर बेथ मुनीने उत्कृष्ट खेळ करताना अर्धशतक झळकावले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात ६ गडी बाद १५६ धावा करता आल्या. तर मुनीने ५३ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शबनम इस्माईलने २६ तर मारिजन कॅपने ३५ धावा खर्च करत प्रत्येकी २-२ गडी बाद केले.