कमनशिबी पुजारा..! 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या पुजाराच्या नावावर झाला हा नकोसा विक्रम, नॅथन लियॉन ठरला पुजाराच्या वाटेतील काटा..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेली दिल्ली कसोटी चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीसाठी खूप खास आहे. चेतेश्वर पुजारा 100व्या कसोटीत शतक करायची मनीषा बाळगून होता. चेतेश्वर पुजाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण लाइफलाइन असूनही तो खाते उघडू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. आता तो दुसऱ्या डावात कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.

नॅथन लियॉनने 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केएल राहुलला आऊट केले. यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजाराचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र दुसऱ्या चेंडूवर तो थोडक्यात बचावला. येथे ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला नाही आणि पुजाराला जीवदान मिळाले.
ऑस्ट्रेलियाने मात्र ही चूक 19व्या षटकात सुधारली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लायनने प्रथम रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले आणि नंतर चौथ्या चेंडूवर पुजारावर आऊट केलं. कर्णधार रोहित 69 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला, तर पुजारा खातेही उघडू शकला नाही. अशाप्रकारे 100 व्या कसोटीत डक आऊट झाल्यामुळे लाजिरवाणा विक्रम केला आहे.