क्रिकेटर आणि क्रिडापटू म्हणून आपला 32 वा वाढदिवस साजरा करणारा विराट कोहली तरुणाईचा प्रेरणास्थान आहे. विराटने भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण आज विराट जिथे आहे त्या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी त्याने खूप कष्ट केले आहेत.
2006 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्याने विराटचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. त्यावेळी 18 डिसेंबर 2006 ला दिल्ली विरुद्ध कर्नाटक संघात सामना खेळला जात होता. त्यावेळी 18 वर्षाच्या विराटने असे काही केले की स्वत:च्या संघालाच नव्हे तर विरोधकांनाही अचंबित केले होते.
त्या सामन्यात कर्नाटकने पहिल्या डावात 446 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करताना दिल्ली संघाने 100 धावांच्या आत 5 खेळाडू गमावले होते.
त्यामुळे आता या सामन्यामध्ये टिकून राहण्याची आणि फॉलोऑन टाळण्याची जबाबदारी 18 वर्षाच्या विराटवर होती. विराट सोबत संघाचा यष्टीरक्षक पुनीत बिष्ट फलंदाजी करत होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटने आपला विकेट टिकवून ठेवली आणि 40 धावावर नाबाद राहिला. पण दिल्लीला फॉलोऑन पासून वाचवण्यासाठी बराच लांबचा प्रवास करायचा होता. दिल्लीचा संघाने 103 धावा केल्या त्यामध्ये त्याचे 40 धावाचे योगदान होते. तिसऱ्या दिवशी सामना वाचवण्याची जबाबदारी विराटवर होती.
पण त्याच रात्री विराटचे 54 वर्षीय वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले. पण असे असतानाही वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्याऐवजी विराटने दुसऱ्या दिवशी मैदानात जाऊन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला वडीलांच्या निधनानंतरही दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग रुममध्ये पाहून त्याच्या संघ सहकाऱ्यांसह प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही आश्चर्य वाटले. विराटनेही अशा परिस्थितीत परिपक्वता दाखवत त्यादिवशी 90 धावांची खेळी केली आणि दिल्लीला फॉलोऑन मिळण्यापासून वाचवले.विराटने ज्या परिस्थित येऊन ही कामगिरी केली होती, ते पाहुन विराटचे कौतुक झाले होते. तसेच विराटची क्रिकेटसाठी असणारी जिद्द आणि चिकाटी सर्वांना यामुळे पहायला मिळाली होती.