हिटमॅन रोहित शर्माची आणखीन एका नव्या विक्रमाला गवसणी! अशी कामगिरी करणारा बनला पाचवा भारतीय खेळाडू

आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये रविवारी भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत विजयाचा षटकार मारला. या विजयात रोहित शर्माने महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर रोहित शर्माच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांने 47 धावा करताच 18000 धावा पूर्ण केल्या. 18 हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू बनला आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी 18000 धावा पूर्ण करणारा खेळाडू सचिन तेंडुलकर हा होय. त्याने 412 सामन्यात 18 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीने 382 सामन्यात 18000 धावा केल्या होत्या. सर्वात कमी सामन्यात 18000 धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू आहे. भारताचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड याने देखील 436 आंतरराष्ट्रीय सामन्यात 18000 धावा केल्या होत्या. राहुल नंतर सौरव गांगुलीने देखील 472 सामन्यात 18000 धावा केल्याची नोंद आहे.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा देखील या खेळाडूंच्या क्लब मध्ये येऊन बसला. त्याने 477 सामन्यात 18 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. 18 हजार धावा पूर्ण करणारा तो जगातला विसावा खेळाडू ठरला.

रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडतोय. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 87 धावांची खेळी केले. या दहा चौकार आणि तीन षट्काराचा समावेश होता. अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने 50 षटकात नऊ बाद 229 धावा केल्या. या धमाकेदार अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीरचा किताब देऊन गौरवण्यात आले.

रोहित शर्माने यंदाच्या स्पर्धेत एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या बहारदार खेळीच्या जोरावर भारताने सलग सहा सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघ या स्पर्धेत सहा विजयासह एकूण बारा गुण मिळवत अंकतालिकेत टॉप वर पोहोचला आहे. सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी भारताला आणखीन एका विजयाची गरज आहे. भारताचा पुढचा सामना 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर तो सेमी फायनल मध्ये पोहोचवणारा पहिला संघ ठरेल.

भारताचा श्रीलंकेविरुद्धचा पेपर हा थोडासा सोपा जाणार आहे. कारण श्रीलंकेच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.