विराटने ठोकलेल्या 48 शतकांपैकी किती सामन्यात भारताचा झाला विजय; आकडेवारी पाहून तुम्हीही व्हाल थक्क

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये ‘चेसमास्टर’ विराट कोहली याला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सध्या विराट कोहलीच्या नावावर वनडे क्रिकेट स्पर्धेत 48 शतकांची नोंद आहे तर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर 49 शतके ठोकल्याची नोंद आहे. सचिनचा हा विक्रम मोडीत काढण्यासाठी विराटला अजून दोन शतकांची गरज आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो सचिनच्या सर्वाधिक वनडे शतकाच्या विक्रमाशी बरोबरी करू शकला असता मात्र तो 95 धावावर खेळत असताना षटकार ठोकण्याच्या नादात झेलबाद झाला. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 48 वनडे शतके ठोकली आहेत. त्यापैकी 40 सामन्यात भारताला दणदणीत विजय मिळवता आला आहे. तर 8 सामन्यातील त्याचे शतक वाया गेले. विराटची ही आकडेवारी पाहून सारे जण थक्क होऊन जातात. शतके ठोकून सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने एकूण 78 शतके ठोकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचे शतक ठोकण्यात सचिन तेंडुलकर टॉपवर आहे. सचिन तेंडुलकरचा हा विक्रम विराट कोहली कोणत्याही क्षणी मोडू शकतो. भारताला या विश्वचषक स्पर्धेत आणखीन चार साखळी सामने खेळायचे आहे. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड आणि नेदरलँड या संघाविरुद्ध हे सामने होणार आहेत विराटचा परफॉर्मन्स पाहता या संघाविरुद्ध एक तरी शतक विराट कोहली करू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 30 वनडे शतके ठोकली आहेत. त्यापैकी 25 वनडे शतकात त्याच्या संघाला विजय मिळवता आला आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये 49 वनडे शतके लगावली आहेत. त्यापैकी 33 वनडे सामन्यात त्याचे शतक भारताच्या विजयात कामी आले. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर त्याला त्याचे विक्रम कोण मोडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सचिन तेंडुलकरने रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय खेळाडूंची नावे सांगितली होती.

आयसीसी 2023 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने पाच सामन्यात तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहेत. 5 सामन्यात त्याने 354 धावा काढत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या या बहारदार खेळीमुळे भारताने सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे. पाच विजयासह भारताने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मजल मारली आहे. विराटचा हा परफॉर्मन्स अंतिम सामन्यापर्यंत कायम राहिला तर भारताला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.