रोहित शर्माच्या धमाकेदार अर्धशतकी खेळी आणि जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने धमाकेदार विजय मिळवला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. या मैदानात उतरताच रोहित शर्माने एक नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार म्हणून खेळताना रोहित शर्माचा हा शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा तो जगातला 50वा खेळाडू बनला आहे.
तसेच शंभर सामन्यात नेतृत्व करणारा भारताचा सातवा खेळाडू बनला आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांनी 100 पेक्षा अधिक सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांनीच वनडे, टेस्ट आणि T20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
रोहित शर्मा 100 व्या सामन्यात नेतृत्व करताना भारताचा विजय झाला आहे. भारताच्या सात कर्णधारापैकी चार कर्णधारांना त्यांच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. माजी कर्णधार राहुल द्रविड याने शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना इंग्लंडविरुद्ध खेळताना 42 धावांनी पराभूत व्हावे लागले.
महेंद्रसिंग धोनी त्याच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना श्रीलंकेविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाचा श्रीलंकेने पाच गडी राखून पराभव केला होता.
कर्णधार म्हणून खेळत असताना मोहम्मद अझरुद्दीन यांच्या शंभराव्या सामन्यात देखील भारताचा पराभव झाला होता. न्युझीलँड ने भारताचा सहा गडी राखून पराभव केला होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताच्या संघाचा देखील पराभव झाला होता. त्याच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करताना भारताचा इंग्लंडने पाच गडी राखून पराभव केला होता.
विश्वचषकामध्ये भारताचा हा सलग सहावा विजय ठरला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.