विश्वचषक 2023 स्पर्धेत 29 व्या सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोश बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर रोहित शर्माने एक नवा विक्रम त्याच्या नावे केला आहे. यासह रोहितने महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्या क्लबमध्ये जाऊन बसला आहे.
भारतीय संघाच्या सतत होणाऱ्या पराभवामुळे 2021 T20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने संघाच्या नेतृत्व पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते आज तागायत रोहित शर्माने शंभर सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय खेळाडू बनला.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचा विक्रम फारच चांगला आहे. त्याने 99 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यात 73 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला तर 23 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यासह दोन सामने ड्रॉ झाले तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची सरासरी 73.73 आहे.
भारताकडून महेंद्रसिंग धोनी याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याने 332 सामन्यात कर्णधार म्हणून काम पाहिले आहेत. त्यापैकी 178 सामन्यात भारताचा विजय झाला आहे. याच यादीमध्ये मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव, राहुल द्रविड यांचे नाव सामील आहे. आता रोहित शर्मा या दिग्गज कर्णधारांच्या क्लब मध्ये सामील झाला आहे.
रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत ही असून सलग पाच सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्यामुळे रोहितच्या संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.