IND vs SL ODI Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळली जात आहे. या मालिकेत यजमान श्रीलंकेचा संघ १-० ने आघाडीवर आहे. त्याचवेळी दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. आता मालिकेतील शेवटचा सामना उद्या दुपारी 2.30 वाजता खेळवला जाणार आहे. हा सामना भारतासाठी ‘करो किंवा मरो’ अश्या स्थितीचा असणार आहे. तर यजमान संघ शेवटचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
IND vs SL ODI Series: मालिकेत दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी!
भारतीय संघाने यजमान संघाचा टी-20 मालिकेत क्लीन स्वीप करून पराभव केला होता. यानंतर एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू झाली, परंतु टीम इंडियाची येथे कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. दोन्ही संघांमधील पहिला सामना अनिर्णित राहिला होता, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाची फलंदाजी कमकुवत दिसली. संघाचे दिग्गज फलंदाज श्रीलंकेचे अर्धवेळ गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजीपुढे बळी पडले.
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवायचा आहे. जर टीम इंडियाने शेवटचा सामना जिंकला तर, मालिका १-१ अशी बरोबरीत राहील. अन्यथा, जर संघ शेवटचा सामना गमावला तर तो मालिका 2-0 ने गमावेल.
IND vs SL ODI Series: नाणेफेक जिंकणे का महत्त्वाचे आहे?
या मालिकेत आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली आहे. श्रीलंकेने दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 230 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 240 धावा केल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले. सामना सुरू असलेल्या मैदानाची खेळपट्टीही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी योग्य ठरत आहे.
दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची अतिरिक्त मदत मिळत आहे. त्यामुळे श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत आहेत. दुसऱ्या डावात फिरकी चेंडू खेळणे फलंदाजांना कठीण जात आहे. तिसऱ्या सामन्यातही खेळपट्टीची भूमिका कमी-अधिक प्रमाणात असेल, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून 230-240 धावा केल्या तर यजमान संघासाठी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते.