IND vs PAK: विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या हायव्होल्टेज सामन्यात झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानच्या संघाला जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. या पराभवातून अजूनही संघ सावरलेला दिसून येत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ सोमवारी बंगळुरूमध्ये दाखल झाला आहे. या सामन्याच्या तयारीसाठी पाकिस्तान संघाने प्रॅक्टिस सेशन रद्द केले आहे. खेळाडूंनी सराव करण्याऐवजी हॉटेलमध्ये बसून आराम करण्यावर भर दिला.
विश्वचषक स्पर्धेतला पाकिस्तानचा हा भारताविरुद्धचा (IND vs PAK)सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ हा मानसिक दबावाखाली खेळताना दिसून येत होता. भारतीय गोलंदाजापुढे पाकिस्तानचा कोणताच फलंदाज तग धरू शकला नाही. सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये कुठलीच फायटिंग स्पिरिट दिसून आली नाही. त्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंना या पराभवाचा इतका धक्का बसला आहे की, काही खेळाडू हे मानसिक ताण-तणावामुळे आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सलामीचा फलंदाज शफिक हा तापाने फणफणत आहे. गेल्या दोन दिवसापासून त्याच्या अंगात प्रचंड ताप आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तो उपचार घेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो फिट झाला नाही तर ,त्याच्या जागेवर फकर जमा हा सलामीला खेळेल.
बेंगलोरच्या एम चिन्हास्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी पाकिस्तानला भरपूर वेळ आहे.
भारताविरुद्ध झालेल्या पराभवाच्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान संघातील खेळाडू रिलॅक्स होण्यावर भर देत आहेत. यासाठी त्यांनी सोमवारी हॉटेल बाहेर पडून काही वेळ फेरफटका मारला तसेच हॉटेलच्या बाहेरच त्यांनी डिनर केला. नॉनव्हेज खाण्यात शौकीन असलेला पाकिस्तानी संघ बंगळूर मध्ये चिकन तंदुरी खाण्यावर भर दिला.

पाकिस्तान संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जर पराभव झाला तर, त्यांचे सेमी फायनल पर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता अवघड होऊन जाईल. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला मात द्यावीच लागेल.
आशियाई देशांमध्ये खेळत असताना पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला नेहमीच वरचढ ठरलेला आहे. त्यामुळे या सामन्यात देखील पाकिस्तानचे पारडे जड असणार आहे. पाकिस्ताने विश्वचषक स्पर्धेतील तीन सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दोन विजयासह पाकिस्तानच्या खात्यात चार गुणांची भर पडली आहे.भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ कसा कमबॅक करतो, याकडे साऱ्या क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी