भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ४६ शतके झळकावली आहेत. शतकांचे अर्धशतक झळकवण्यासाठी त्याला केवळ ४ शतकांची गरज आहे. विराटला केवळ वर्तमान क्रिकेटमधील नव्हे तर क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हटले जाते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ सोबत त्याची नेहमीच तुलना केली जात असते. मात्र आता पाकिस्तानचा एक असा फलंदाज आहे, जो बहुतांश लोकांना माहितही नसेल. अशा क्रिकेटपटूने स्वतःची तुलना थेट विराट कोहली सोबत केली आहे.
पाकिस्तान संघातील फलंदाज खुर्रम मंजूर याने स्वतःची तुलना विराट कोहली सोबत करून अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. पाकिस्तान संघासाठी २६ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खूर्रमने १६ कसोटी, ७ वनडे आणि ३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २००८ मध्ये पाकिस्तान संघासाठी पदार्पण करणाऱ्या खुर्रमला भारतीय संघाविरुद्ध केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा ही विराटने डायरेक्ट हिट करत त्याला माघारी धाडले होते.
तो २०१६ आशिया चषक स्पर्धेतील सामना होता. त्यानंतर त्याला पुन्हा कधीच पाकिस्तान संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “मी विराट सोबत स्वतःची तुलना करू शकत नाहीये. मात्र सत्य हे आहे की, ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये जे टॉप -१० फलंदाज आहेत, त्यामध्ये मी सर्वोच्च स्थानी आहे. माझ्या नंतर विराट कोहलीचा नंबर येतो. त्याने दर ६ डावांनंतर १ शतक झळकावले आहे. तर मी ५.६८ डावांनंतर शतक झळकावले आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी ४८ डावांमध्ये २४ शतके झळकावली आहेत. २०१५ पासून ते आतापर्यंत पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजाने जितक्या धावा केल्या आहेत,त्यापेक्षा अधिक धावा मी केल्या आहेत. नॅशनल टी -२० लीगमध्ये देखील मी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तरीदेखील मला दुर्लक्ष केलं गेलं आणि मला बाहेर का केलं गेलं? याचं कोणीही मला योग्य कारण सांगितलं नाही.”
हे ही वाचा..
ठरलं तर ‘या’ दिवशी होणार जसप्रीत बुमराहचे पुनरागमन! स्वतः रोहित शर्माने केला खुलासा..