देशांतर्गत क्रिकेटमधील
सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना शनिवारी (5 नोव्हेंबर) खेळला गेला. मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने अखेरच्या षटकात 3 गडी राखून विजय मिळवून विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे मुंबईचे हे पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जेतेपद आहे.
𝐂. 𝐇. 𝐀. 𝐌. 𝐏. 𝐈. 𝐎. 𝐍. 𝐒! 🏆 🙌
Say hello to the new #SyedMushtaqAliT20 winners – Mumbai! 👋
Scorecard 👉 https://t.co/VajdciaA1p#HPvMUM | #Final | @MumbaiCricAssoc | @mastercardindia pic.twitter.com/gx1KN9aNyP
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 5, 2022
तब्बल 59 देशांतर्गत
विजेतेपदे पटकावलेल्या मुंबईला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकदाही मजल मारता आली नव्हती. यावर्षी विदर्भाला उपांत्य सामन्यात पराभूत करत त्यांनी ही कामगिरी केली. ईडन गार्डन येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर हिमाचल प्रदेशचे आव्हान होते. हिमाचल प्रदेश देखील प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी खेळत होता.
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय तनुष कोटीयान व मोहित अवस्थी यांनी सार्थ ठरवला. दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेत हिमाचलची अवस्था 6 बाद 58 अशी केली. मात्र यानंतर अनुभवी निखिल गंगता (22), आकाश वशिष्ठ (25) व एकांत सेन (37) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत हिमाचल प्रदेशला 143 पर्यंत मजल मारून दिली. तनुष कोटीयान याने मुंबईसाठी सर्वाधिक तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना मुंबईचे दोन्ही सलामीवीर अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ झटपट बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर (34) व यशस्वी जयस्वाल (27) या जोडीने 41 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, वैभव अरोराने 20 धावांच्या अंतरात तीन बळी मिळवत सामन्यात रंगत आणली. मागील दोन वर्षापासून रणजी ट्रॉफीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानने या महत्त्वाच्या सामन्यात आपला अनुभव पणाला लावला. त्याने अखेरपर्यंत संयमाने फलंदाजी करत नाबाद 36 धावा करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.