न्यूझीलंड विरुध्द इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने सामन्याच्या पाचव्या दिवशी १ रनने विजय मिळवला. यासह अनेक मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. न्यूझीलंड संघ हा १ रनने कसोटी सामना जिंकणारा केवळ दुसराच संघ ठरला आहे.
विजयासाठी २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ खेळाच्या पाचव्या दिवशी २५६ धावांवर गडगडला आणि त्यांना या कसोटी सामन्यात अवघ्या एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटची विकेट जेम्स अँडरसनच्या रूपाने पडली आणि न्यूझीलंडच्या नावे ऐतिहासिक विजयाची नोंद झाली.
इंग्लंडने पहिला डाव ४३५/८ वर घोषित केला. जो रूटने नाबाद १५३ आणि हॅरी ब्रूकने १८६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात केवळ २०९ धावांवरच गारद झाला. यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ४८३ धावा केल्या. केन विल्यमसनने १३२ धावांची तर टॉम ब्लंडेलने ९० धावांची खेळी केली. अशाप्रकारे किवी संघाने इंग्लंडसमोर २५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते परंतु त्यांना केवळ २५६ धावाच करता आल्या.

१ रनने कसोटी सामना जिंकणारा दुसराच संघ..
आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड हा कसोटी सामना १ रनने जिंकणारा दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी १९९३ मध्ये ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा १ रनने पराभव केला होता. त्याचवेळी, २००५ च्या ऍशेस मालिकेत बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाचा 2 रनने पराभव केला होता.