या महिलेने हिटलरच्या तावडीतून 2500 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..
हिटलर जेव्हा जर्मनीचा सर्वोच्च सत्ताधीश होता त्यावेळी त्याने केलेल्या अत्याचारांची कल्पना आपल्याला आहेच. हिटलरने ज्यू लोकांच्या विरोधात राबविलेल्या अत्याचाराच्या असंख्य काळ्या कथा आपण नेहमी ऐकत असतो. ज्यू लोकांना हिटलरने कशा प्रकारे छळछावणीत ठेवलं आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, हे अंगावर शहारे आणणारं आणि माणुसकीला काळिमा फासणारं होतं.

पण या हिटलरच्या जुलमी राज्यात अनेक देवदूतासारखी माणसं देखील होती, ज्यांनी आपल्या प्राणाला पणाला लावले होते व असंख्य ज्यू लोकांचे प्राण वाचवले होते. अश्याच नावांपैकी एक प्रसिद्ध नाव होते ‘ऑस्कर शिंडलर’ यांचे, ज्यांनी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या असंख्य ज्यू लोकांचे प्राण वाचवले होते.त्यावर ‘शिंडलर्स लिस्ट’ नावाचा प्रसिद्ध चित्रपट देखील तयार करण्यात आला आहे.‘ऑस्कर शिंडलर’ यांच्या प्रमाणे एक महिला होती, तिने २५०० ज्यू मुलांचे प्राण वाचवले होते. त्या महिलेचं नाव होतं इरेना सॅण्ड्लर. जेव्हा नाझी जर्मनीत सत्तेत आले, त्यांनी आपली ज्यूविरोधी मानसिकता उघड करण्यास सुरुवात केली.
त्यांनी आपल्या शेजारी असलेल्या पोलंडवर विजय मिळवत आपली राजवट त्यांच्यावर लादली. त्यांनी पोलिश ज्यू लोकांना तिथल्या नोकऱ्यांवरून बडतर्फ केले.पोलंडमधील सामाजिक संस्थेला तेव्हा पोलिश ज्यू लोकांच्या मदतीसाठी मज्जाव करण्यात आला. ज्यू लोकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी बनविण्यात आलेले समाज संघ बरखास्त करण्यात आले. पण हे इरेना सॅण्डलरला मंजूर नव्हते. तिने या विरोधात लढा उभारायला सुरवात केली.
तिने चार वर्षात ज्यू संस्थांच्या नावाचे ३००० बनावट डॉक्युमेंट बनवून घेतले.
याद्वारे ती पोलंडमधील ज्यू नागरिकांना ओळख लपवण्यात मदत करत होती. तिने १९४१ पर्यंत ज्यू नागरिकांची मदत करण्याचे काम चालू ठेवलं, ज्यावेळी जर्मन नाझी पूर्ण ताकदीने त्याठिकाणी आपलं कार्य करत होते. पुढे ती ‘झेगोटा’ नामक ज्यू लोकांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या भूमिगत संघटनेच्या संपर्कात आली.तिच्यावर वॉर्सा शहरातील छळछावणीतुन लहान ज्यू मुलांच्या सुखरूप मुक्ततेची जबाबादारी सोपवण्यात आली. ती लगेचच त्या कामावर रुजू झाली.
वॉर्साच्या छळछावणीत तब्बल तीन लाख ज्यू लोकांना बंदी म्हणून ठेवण्यात आलं होतं.
छळछावणीत एवढ्या मोठ्या संख्येने लोक ठेवण्यात आले असल्याने मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरायला सुरूवात झाली. त्यावेळी जर्मन सैनिकांना रोगांची लागण होऊ नये, म्हणून डॉक्टर व नर्सेसच्या टीम्सला आत सोडलं जायचं. या अशाच एका टीमचा भाग इरेना होती. जेव्हा इरेना आतमध्ये औषधोपचार, अन्न पुरवठा व कपडे देणे इत्यादी कामे करायला जायची तेव्हा वेगवेगळे बॉक्स घेऊन जायची.
प्रत्येक बॉक्समध्ये ती २-३ वर्षांच्या नवजात अभ्रकांना, लहान मुलांना टाकून छळछावणीच्या बाहेर घेऊन जायची, असं करत करत तिने तब्बल २५०० लहान मुलांची सुटका त्या छळछावणीतून केली होती.
त्यातल्या ४०० मुलांना तर तिने स्वतः सोबत घेऊन सोडवलं होतं. तिने ज्यावेळी त्या मुलांची सुटका केली तेव्हा जर्मन सैनिकांचा सर्वत्र पहारा असायचा, जर तिचं बिंग फुटलं असतं, तर तिला प्राणाला मुकावं लागलं असतं.त्या मुलांच्या पालकांना त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाऊ असं आश्वासन देऊन ती त्या मुलांना घेऊन तर जायची पण पुढं त्या मुलांचं काय होईल, याची तिला कल्पना नसायची. तिला तर हे देखील माहिती नसायचं की ती हा दिवस निभावून नेऊ शकेल का? पण तिने हार मानली नाही.

त्या छावणीतून बाहेर काढण्यात आलेली मुलं झेगोटा संघटनेच्या वेगवेगळ्या प्रतिनधींच्या मार्फत वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आले. त्या मुलांची ओळख पटू नये म्हणून त्यांना ख्रिश्चन पोशाख घालण्यात आले. त्यांना ख्रिस्ती मंत्र तोंडपाठ करून घेण्यात आले.
रात्री बेरात्री त्या मुलांना बायबलचं एखादं वाक्य विचारलं तर ते बोलू शकतील अशा प्रकारची त्यांची तयारी करण्यात आली. त्या मुलांची ज्यू म्हणून ओळख पटू नये यासाठीच हा अट्टहास करण्यात आला होता. काही मुलांची रवानगी ज्यू मुलांच्या अनाथालयात करण्यात आली. काही मुलांना युरोपच्या वेगेवेगळ्या भागात स्थलांतरित करण्यात आले. इरेनाने आपल्या अनेक सहकाऱ्यांना या दरम्यान अदृश्य होताना पाहिले.
तिने हार न मानता छळछावणीतल्या लोकांच्या सुटकेसाठी वेगवगेळ्या मार्गाने प्रयत्न चालू ठेवले. १९४३ साली अखेरीस ती जर्मन सैनिकांच्या हाती लागली. तिला फाशीची शिक्षा देणार होते तेव्हा तिच्या एका सहकाऱ्याने जर्मन सैनिकांना लाच देऊन तिची फाशी रोखली. पुढे युद्ध संपेपर्यंत ती कैदेतच होती.
युद्धात जर्मनीचा पडाव झाला आणि तिची सुटका झाली. पण त्यानंतरही तिने हार मानली नाही. सुटका झाल्यावर तिने लगेचच नर्सची नोकरी करायला सुरुवात केली. आपण मुक्तता केलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहचवण्याचा तिचा मानस होता, पण त्यांच्या कार्याला यश मिळालं नाही. कारण त्या मुलांचे पालक जे त्या छळछावणीत होते, त्याठिकाणीच मारले गेले होते. याचे दुःख त्यांना कायम राहिले.त्यांनी केलेल्या कार्यसाठी त्यांचा इस्त्रायली शासनाकडून गौरव करण्यात आला. त्यांना १९६३ साली रायटिस अमंग्स्ट दि नेशन्स या पुरस्काराने गौरवण्यात आले.पण पोलंडमधील कम्युनिस्ट राजवटीमुळे हा पुरस्कार स्वीकारता आला नाही.
पुढे १९८३ साली त्यांनी इस्रायलला जाऊन हा पुरस्कार घेतला. २००३ साली व्हॅटिकनचे प्रमुख पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना पत्र लिहून त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचे आभार मानले.

याच्या पुढच्याच वर्षी पोलंड सरकारने त्यांना आपला सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले. त्यांनी ज्या मुलांचे जीव वाचवले त्या मुलांनी त्यांची २००७ साली भेट घेतली.
हेही वाचा: