बाबरी मशीदीखाली ‘मंदिर ‘असल्याचा दावा सर्वांत आधी या मुस्लीम पुरातत्वशास्त्रज्ञांनी केलेला…
अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अयोध्या राम मंदिर-बाबरी मशीद वाद आता संपला आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झाले.आणि प्रत्यक्ष मंदिराच्या कामास सुरवातही झाली आणि आता येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहेत.
अयोध्या हा वाद काही एकर जमिनीच्या मालकी हक्कासाठी नव्हे तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या हिंदू संस्कृतीचा मान वापस मिळवून देण्यासाठी पेटलेला होता. ज्याचे फलित म्हणून आता श्रीराम मंदिरात विराजमान होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत.
श्रीराम हे केवळ एक अवतारी देवता नसून भारतातील लोकांमध्ये रचलेल्या व्यवस्थेचे मार्गदर्शक देखील आहेत. अयोध्या ही भगवान रामलला यांची मातृभूमी आहे आणि त्यावर आपला अधिकार सांगण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. परंतु मीर बाकी याने रामजन्मभूमीवर बांधलेले मंदिर तोडले आणि त्यावर एक अशी रचना उभारली ज्यामुळे भगवान श्रीराम यांना शतकानुशतके अपमान सहन करावा लागला होता.
इतिहासामधील ही पहिली घटना असेल जिथे देवाला जन्मस्थान परत घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. आणी याच संघर्षामध्ये कित्तेक लोकांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे. या वर्षानुवर्षे चालत आलेल्या संघर्षामध्ये अनेक लोकांचे प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष योगदान आहे.
या सर्व प्रकरणात एका व्यक्तीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. ते म्हणजे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. के. के. मोहम्मद. यांनीच पहिल्यांदा बाबरी खाली राम मंदिरच होते.असं ठणकावून सांगितले होते.
स्वतः मुस्लीम असूनही जातीपातीला थारा न देता आपले कर्तव्य समजून बाबरी मशीदखाली मंदिराचे अवशेष आहेत असा दावा पुराव्यानिशी केला होता.
के. के. मोहम्मद हे एक प्रसिद्ध भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत. ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे प्रादेशिक संचालक (उत्तर) होते. सध्या ते आगा खान कल्चर ट्रस्टमध्ये पुरातत्व प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. के. के. मुहम्मद यांचा जन्म केरळमधील कालिकट येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बीयरन कुट्टी हाजी आणी मारीयाम् यांच्या पाच अपत्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे आहेत.
कोडावलीच्या शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून १९७३ ते १९७५ या कालावधीत इतिहासात पदव्युत्तर शिक्षण ( मास्टर डिग्री) घेतले. तसेच भारतीय स्कूल ऑफ पुरातत्व सर्वेक्षण,नवी दिल्ली कडून पुरातत्वशास्त्र मध्ये डिप्लोमा केला आहे.
के. के. मोहम्मद यांनी शोधून काढलेले काही मुख्य पुरातत्व शोध
-
इबादत खाना ही रचना ज्यामध्ये अकबरने दीन-ए-इलाही (भारतीय धर्मनिरपेक्षतेची रोपवाटिका) नावाचा संमिश्र धर्म निर्माण केला.
-
उत्तर भारतातील तेहपूर सिक्री येथील अकबर याने बांधलेले पहिले ख्रिश्चन चॅपलचा शोध.
-
सम्राट अशोकाने बांधलेल्या केसरीचा बौद्ध स्तूपचे उत्खनन.
-
राजगीर येथील बौद्ध स्तूपचे उत्खनन.
-
कोलहु वैशाली येथील बौद्ध पुरातत्व स्थानाचे उत्खनन.
-
केरळमधील कॅलिकट आणि मालपुरम जिल्ह्यातील दगडांमध्ये कोरलेली लेणी,छात्रीकर दगड यांचे खोदकाम करून शोध.
-
नक्षलवादी आणी डाकूंचा गढ असणाऱ्या भागातही विलक्षण कामगिरी
के. के. मोहम्मद यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर जवळ दंतेवाडा जिल्ह्यातील बार्सुआर आणी समलूर हि मंदिरे जतन केली. हा प्रदेश नक्षलवादी कारवायांचा गढ म्हणून ओळखला जातो. २००३ मध्ये के. के. मोहम्मद यांना नक्षलवादी कार्यकर्त्यांना समजून आणि त्यांच्या सहकार्याने हि मंदिरे जपली आहेत.
बाटेश्वर, मुरैना हे ग्वाल्हेरपासून ६० कि.मी. अंतरावर प्राचीन शिव आणी विष्णू मंदिरे आहेत. हे मंदिर खजुराहोच्या २०० वर्षांपूर्वी गुर्जर-प्रतिहार घराण्याच्या काळात ८ व्या आणी ११ व्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले होते. हा परिसर निर्भयसिंग गुर्जर आणी गदारिया दरोडेखोरांच्या ताब्यात होता. ही मंदिरे जीर्णोद्धार करण्यासाठी के. के. मोहम्मद यांना दरोडेखोरांना पटवून देण्यात यश आले. या प्रदेशात त्यांच्या कार्यकाळात ४० मंदिरे त्यांनी परत मिळविली. पोलिसांनी दरोडेखोरांचा खात्मा केल्यावर खाण माफियांनी या परिसरावर आपला कब्जा केला होता.
के. के. मोहम्मद यांचे आत्मचरीत्र
के. के. मोहम्मद यांनीच अयोध्यामधील बाबरी मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले आहेत असा दावा केला होता. डॉ. केके मुहम्मद यांनी मल्याळममध्ये लिहिलेल्या ‘जानएन्ना भारतीयन’ या आत्मचरित्रात दावा केला आहे की १९७६-७७ मध्ये अयोध्येच्या उत्खननात मंदिरातील अवशेष सापडल्याचा पुरावा होता. हे उत्खनन तत्कालीन पुरातत्व सर्वेक्षण महासंचालक प्रोफेसर बीबी लाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. त्यावेळी के.के.मोहम्मदही त्या संघात सदस्य म्हणून सामील होते.
के. के. मोहम्मद यांनी आपल्या पुस्तकात हेही लिहिले आहे की, “मला माहित असलेली आणि मी म्हटलेली प्रत्येक गोष्ट एक ऐतिहासिक सत्य आहे. आम्हाला विवादित साइटवर १४ स्तंभ सापडले आहेत. या सर्व खांबांमध्ये घुमट कोरले गेले होते. हे ११ व्या आणि १२ व्या शतकातील मंदिरांमध्ये असणाऱ्या घुमटांसारखे होते. घुमटात अशी एकूण ९ चिन्हे सापडली आहेत, जी कि मंदिराशी मिळती जुळती आहेत”.
के. के. मोहम्मद यांनी हे पण म्हटले होते की, खोदकामातून हे स्पष्ट झाले की मशीद मंदिराच्या ढिगाऱ्यावर उभारली गेली होती. त्या दिवसांत मी बर्याच इंग्रजी वर्तमानपत्रांतही याबद्दल लिहिले होते. परंतु मला जाणीवपूर्वक लेटर टू एडिटर या कॉलममध्ये (वर्तमानपत्रात अगदी छोटी जागा) देण्यात आली होती. २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मुहम्मद हे हैदराबादच्या आगा खान ट्रस्टमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे.
रामजन्मभूमी – के. के. मोहम्मद
विल्यम फिंच आणि जोसेफ टॅफिनथलर यांचा संदर्भ के. के. मोहम्मद देतात. सोबतच या वादग्रस्त ठिकाणी भगवान रामाची पूजा होत असल्याचा उल्लेख मुघल बादशाह अकबर यांच्या ‘दरबारनाम्यात’ म्हणजे त्यांच्या दरबारातले इतिहासकार अबू फजल यांनी फारसीत लिहीलेल्या ‘आईन-ए-अकबरी’ मध्येही असल्याचं मोहम्मद म्हणतात.
डाव्या विचार सारणीच्या लोकांवर टीका करीत मुहम्मद यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की या लोकांनी प्रकरण इतके गोंधळात टाकले होते अन्यथा या अगोदरच हा विषय मिटला असता. याशिवाय प्राध्यापक इरफान हबीब, रोमिला थापर, बिपिन चंद्र, एस.आर. गोपाळ यांच्यासारख्या इतिहासकारांवर टीका करताना ते म्हणाले की, या सर्वांनी मुस्लिम विचारवंतांना तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.
के. के. मोहम्मद- पद्मश्री
अयोध्येचे वर्णन जातीय विवाद म्हणू करणे म्हणजे एका विशिष्ट समुदायाला सनातन परंपरेविरूद्ध प्रवृत्त करण्याचा कट होता. या कटामध्ये तथाकथित प्रख्यात इतिहासकारहि दोषी होते. त्यांच्यामार्फतच अशा कथा मांडल्या गेल्या यामुळेच समुदायाच्या विशेष भावना दुखावल्या गेल्या आणि हिंसक प्रतिक्रिया निर्माण होऊ लागल्या.
पुरातत्वशास्त्रज्ञ केके मुहम्मद यांच्या “मी भारतीय आहे” ह्या पुस्तकामुळे या कटाचा पर्दाफाश झाला आहे. २०१९ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते के. के. मोहम्मद यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…