भारतात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेला शानदार सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघ आपल्यातील प्रतिभा खेळाच्या माध्यमातून दाखवून देत आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारत हे संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेण्यासाठी धडपडत आहेत तर काही संघांना अजूनही विजयाचे खाते उघडले नाही. गुरुवारपर्यंत विश्वचषकात एकूण दहा सामने झाले आहेत. एका आठवड्यात झालेल्या दहा सामन्यात मोठे विक्रम मोडले गेले तर काही नवीन विक्रम रचले गेले. विश्वचषकात आत्तापर्यंत झालेल्या नव्या विक्रमाबद्दल एक नजर टाकूया.
विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत झाले हे 5 मोठे विक्रम
1.सर्वाधिक शतकांचा विक्रम (Most Century in world cup history)
दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने विस्फोटक शतकी खेळी केली. हिटमॅनचे हे विश्वचषकातील सातवे शतक ठरले. विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आता रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत विश्वचषकात एकूण पाच शतके ठोकली होती.

रोहितने सचिनचा हा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने केवळ तीनच विश्वचषकात हा विक्रम केला आहे. मात्र सचिन तेंडुलकरला पाच शतक करण्यासाठी सहा विश्वचषक स्पर्धा खेळावे लागले. या सोबतच रोहितने आणखीन एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम रोहित ने केला आहे.
2.सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग (Highest Run Chase in World cup 2023)
यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानने श्रीलंके विरुद्ध झालेल्या सामन्यात 345 धावांचे आव्हान सहजपणे पार केले. आतापर्यंत कोणत्याही संघाला एवढी मोठी धावसंख्या यशस्वीरित्या पार करता आली नाही. विश्वचषकात सर्वाधिक धावा चेज करण्यामध्ये आता पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. या विजयात पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफिक आणि मोहम्मद रिजवान यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 176 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत पाकिस्तानच्या विजयाची गुढी उभारली.
3.सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम (Highest Score in World cup)
टेम्बा बवूमा याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळताना 428 इतक्या डोंगरा एवढ्या धावा उभ्या केल्या. वर्ल्डकपमधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. यात दक्षिण आफ्रिकेच्या तीन प्रमुख फलंदाजांनी दमदार शतकी खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेवर दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला.
4.सर्वात वेगवान शतक (fastest Century in world cup)
श्रीलंकेविरुद्ध खेळताना आफ्रिकेचा स्टार फलंदाज ॲडम मारक्रम याने 49 चेंडूत झुंजावती शतकी खेळी केली. या खेळी त्याने 14 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार खेचले. वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करण्याचा विक्रम आता ॲडम च्या नावावर झाला आहे. 12 वर्षापूर्वी 2011 मध्ये आयर्लंडचा खेळाडू केविन ओबेरायन याने इंग्लंड विरुद्ध खेळताना अवघ्या 51 चेंडूत तडाखेबाज खेळी केली होती.
5.सर्वात वेगवान बळींचे अर्धशतक (Fastest 50 Wickets)
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने कमी डावात 50 बळी टिपण्याचा पराक्रम केला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात ईशान किशनला बाद करून त्याने हा विक्रम आपल्या नावे केला. सर्वात कमी डावात 50 बळी टिपण्याचा विक्रम यापूर्वी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा याच्या नावावर होता. मलिंगाने 25 डावात 50 बळी टिपण्याचा विक्रम केला होता.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..