वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माला हा विक्रम करण्यासाठी आणखी 29 चौकारांची गरज

भल्या-भल्या गोलंदाजाची बोलती आपल्या बॅटने बंद करणारा हिटमॅन रोहित शर्मा सध्या कमालीच्या फॉर्मत आहे. विश्वचषकात त्याच्या अग्रेसिव खेळावरून तो भारतीय संघाला विश्वचषक देऊनच थांबणार आहे, असे दिसत आहे. रोज नव्या सामन्यात नवनवीन विक्रमांचे मनोरे तो रचत आहे. सलामीला खेळणारा रोहित शर्मा आणखीन एका विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताचे आणखीन तीन साखळी सामने राहिले आहेत. या सामन्यात देखील पुन्हा त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला तर आणखीन नव्या विक्रमाची नोंद त्याच्या नावे होऊ शकते.

रोहित शर्माला वन-डे क्रिकेटमध्ये एक हजार चौकार ठोकण्याचा विक्रम पूर्ण करण्यासाठी त्याला 29 चौकारांची गरज आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 971 चौकार ठोकले आहेत. सध्या ऍक्टिव्ह खेळाडू असलेला भारताचा चेसमास्टर विराट कोहली याच्या नावावर 1255 चौकार ठोकल्याची नोंद आहे. विराटला या विक्रमात पाठीमागे टाकण्यासाठी रोहितला अजून बराच अवकाश आहे.

विश्वचषक 2023 मधील सहा सामन्यांमध्ये रोहित शर्माने 398 धावांची नोंद केली आहे. यात एका दमदार शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने या विश्वचषक स्पर्धेत जवळपास 20 षटकार नोंदवले आहेत. तसेच त्याच्या नावे 43 चौकार ठोकल्याची नोंद आहे. त्याचा हा परफॉर्मन्स पुढच्या सामन्यात कायम राहिला तर भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी कोणीच रोखणार नाही. भारताने विश्वचषक जिंकल्यास विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर तो तिसरा कर्णधार ठरेल. विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्णधार पदाची सारी सूत्रे रोहितच्या खांद्यावर आली होती. रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला पाच वेळा लीग से जितेपद मिळवून दिले होते. त्याच्या या बहारदार कामगिरीमुळेच त्याला वन डे क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये संघाचा  नियमित कर्णधार करण्यात आले.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 312 षटकार ठोकलेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या नावावर आहे. त्याने 351 षटकार ठोकले आहेत.

सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्टइंडीजचा माजी फलंदाज क्रिस गेल हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 331 षटकार ठोकल्याचे नोंद आहे. हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाले आहेत. 36 वर्षीय रोहित शर्माची कारकीर्द अजून दोन-चार वर्ष अशीच बहारदार राहिली तर या दोघांचे विक्रम तो सहजपणे मोडू शकतो.