भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs newzealand) या दोन्ही संघांमध्ये पार पडलेला पहिला वनडे सामना अतिशय रोमांचक ठरला. १८ जानेवारी रोजी पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकात विजय मिळवत मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ८ गडी बाद ३४९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने देखील झुंज दिली. मात्र केवळ १२ धावांनी न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताने दिले ३५० धावांचे आव्हान..
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. ज्या खेळपट्टीवर रोहित आणि विराट लवकर बाद झाले. त्याच खेळपट्टीवर शुभमन गिलने किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने १४९ चेंडुंचा सामना करत २०८ धावांची खेळी केली.
ब्रेसवेल आणि सॅंटनरने वाढवली चिंता..
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाला देखील हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीवीर फलंदाज फिन ॲलेन ४० तर डेवॉन कॉनव्हे १० धावा करत माघारी परतले. संघातील मुख्य फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर ब्रेसवेल आणि सॅंटनरने डाव सावरला. ब्रेसवेल फलंदाजीला आला तेव्हा संघाची धावसंख्या ५ गडी बाद ११० इतकी होती. त्यानंतर त्याने जोरदार फलंदाजी करायला सुरुवात केली. ब्रेसवेलने या डावात १४० धावांची खेळी केली. तर सॅंटनरने ५७ धावांचे योगदान दिले.
रोहितची ही रणनिती ठरली फायदेशीर..
रोहित शर्माने या सामन्यात फलंदाजीने योगदान दिले नसले तरीदेखील त्याचा एक निर्णय भारतीय संघासाठी महत्वाचा ठरला. ४५ वे षटक सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड संघ सहजरीत्या आव्हान पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र त्यावेळी रोहितने एक महत्वाचा निर्णय घेतला. त्याने हार्दिक पंड्याला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. त्याने या षटकात कमी धावा खर्च करत किवी फलंदाजांवर दबाव टाकला. त्याचा फायदा पुढील षटक टाकत असलेल्या मोहम्मद सिराजला झाला. त्याने पुढील षटकात २ गडी बाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.