आफ्रिकन चित्ते कांगारूंना पडले भारी… सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षणामुळे पाहावे लागले पराभवाचे तोंड; ऑस्ट्रोलियाच्या नावावर झाले नकोसे विक्रम.
AUS vs SA: विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये काल ऑस्ट्रोलीया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA )आमने सामने होते. दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक 2023 च्या दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 7 बाद 311 धावा केल्या. यात सलामवीर क्विंटन डिकॉक याने 106 चेंडूत आठ चौकार आणि पाच षटकाराच्या मदतीने 109 धावांची खेळी केली तर एडन मारक्रम याने 44 चेंडू 56 धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 40.5 षटकात 177 धावांवर आटोपला. यात मार्नस लाबुशेन ने सर्वाधिक 46 तर मिचेल स्टार्क ने 27 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कंगीसो रबाडा याने सर्वाधिक तीन गडी बाद केले तर मार्को यानसेन, तबरेज शम्सी आणि केशव महाराज प्रत्येकी दोन गडी टिपले. लुंगी एनगिडी एक गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर बावूमा 35 धावा काढून बाद झाला. त्यानंतर डिकॉकने रसी वान डर डुसेन सोबत 50 धावांची भागीदारी केली. डुसेंन 26 धावा काढून बाद झाला. हेनरिच क्लासेन 29, मार्को यानसेन 26 तर डेविड मिलर 17 धावा काढून बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. जोश हेजलवुड, पॅट कमिंस आणि एडम जॅम्पा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
शतकी खेळी करणाऱ्या क्विंटन डिकॉक याला सामनावीरचा किताब देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत सलग दुसरे शतक ठोकणाऱ्या डीकॉकचा हा शेवटचा विश्वचषक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने शंभर धावांची खेळी केली होती. आयपीएल मध्ये तो लखनऊ सुपर जॉईंट संघाकडून खेळत असतो. हे मैदान त्याचे जणू काही होम ग्राउंड आहे. विश्वचषकापूर्वीच त्याने निवृत्तीची घोषणा केल्याने ही स्पर्धा गाजवण्याचा तो प्रयत्न करताना दिसून येतोय.
पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा या विश्वचषकातील हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात भारताने त्यांचा दणदणीत पराभव केला होता. तर दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला हरविले होते.

AUS vs SA: ऑस्ट्रोलियाचा विश्वचषकामधील सर्वांत मोठा पराभव.
ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातला हा सर्वात मोठा पराभव आहे. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने केम्सफोर्ड येथे झालेल्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 118 धावांनी पराभव केला होता.
2000 सालानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्यांदा 200 धावांच्या आत सर्वबाद झाला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया पहिल्या दोन्ही सामन्यात 200 धावाही करू शकला नाही. 2011 आणि 2015 साली देखील ऑस्ट्रेलियाचा संघ 200 धावा करू शकला नाही.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..