आयसीसी विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत आणखीन एक चमत्कार पाहायला मिळाला. मंगळवारी धर्मशाळाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नेदरलँडच्या संघाने धमाकेदार प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य संघाला 38 धावांनी पराभूत करत साऱ्यांना चकित करून सोडले. नेदरलँड्सने दिलेले 246 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेचा संघ करू शकला नाही. 207 धावांवर सर्व संघ बाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवास कारणीभूत ठरला तो म्हणजे त्यांचा घरचा भेदी अर्थातच वॅन डेर मर्वे. विजयाचा शिल्पकार म्हणून वॅन याची चर्चा होऊ लागली.
38 वर्षीय वॅन डेर मर्वे याने सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करत नेदरलँडला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. वॅनमैदानावर आला तेव्हा नेदरलँड संघाची अवस्था सात बाद 140 अशी अत्यंत नाजूक होती. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याच्यासोबत त्याने 64 धावांची भागीदारी केली. त्यामुळे नेदरलँडचा संघ हा 200 चा आकडा पार करू शकला.
फलंदाजीत त्याने तीन चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने 19 चेंडूत ताबडतोब 29 धावा काढल्या. तसेच गोलंदाजीत देखील चमकदार कामगिरी करत कर्णधार टेंबा बावूमा आणि रासी वान दुसे या दोन महत्त्वपूर्ण खेळाडूंची त्याने विकेट घेतली. तसेच क्षेत्ररक्षण देखील अफलातून करत आफ्रिकन चित्त्यांना चांगल्याच वेदना दिल्या.
वॅन यापूर्वी 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 13 T20 आणि 13 वन डे सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2010 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी कमी मिळाल्यामुळे त्याने नेदरलँड ची वाट धरली. विशेष म्हणजे त्याची आई ही मुळता नेदरलँडची आहे. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज 2015 मध्ये नेदरलँड संघाकडून खेळू लागला.
वॅन डेर मर्वेने नेदरलँड संघाकडून 19 वनडे सामन्यात नेदरलँड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याच्या नावावर एक अर्धशतकासह 130 धावा आहेत तर 51 T20 सामन्यात दोन अर्धशतकासह त्याने 465 धावा काढल्या आहेत. यासह गोलंदाजीत त्याच्या नावावर 56 बळीची नोंद आहे. आयपीएल मध्ये देखील त्याने बंगळूरच्या संघाकडून खेळताना सुरेख कामगिरी करत 21 सामन्यात 21 बळी घेतले आहेत. वॅन नेदरलँड संघाच्या विजयानंतर भलताच खुश दिसून आला. तसेच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
नेदरलँडच्या संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेवर हा त्यांचा दुसरा विजय ठरला आहे. या विजयामुळे नेदरलँडच्या खात्यात दोन गुणांची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे चार सामन्यात तीन विजयासह सहा गुणांची नोंद झाली आहे. गुणतालिकेत हा संघ न्यूझीलंड नंतर तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ गुणतालिकेत टॉपवर आहे.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी