जन्माने जरी राजपुत्र नसले तरीही, कर्माने मात्र Shahu Maharaj शिवाजी महाराजांचे वंशजचं होते..
जन्माने जरी राजपुत्र नसले तरीही, कर्माने मात्र शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशजचं होते..
एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक क्रांतीकारकांनी, विचारवंतानी आणि समाजसुधारकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापुरच्या करवीर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे महत्वपुर्ण असे स्थान असुन थोर महापुरुषांच्या यादीतुन शाहु महाराजांचे नाव कोणालाही वगळता येणार नाही.
शाहु महाराजांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात दि.२६ जुन १८७४ रोजी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे व आईचे नाव राधाबाई होते तर शाहु महाराजांचे मुळनाव यशवंतराव उर्फ बाबासाहेब घाटगे होते. कोल्हापुरचे चौथे शिवाजी महाराज हे अहमदनगर येथे २५ डिसेंबर १८८३ मध्ये मरण पावले.
ते निपुत्रीक असल्यामुळे कोल्हापुरच्या गाधीचा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा त्यांच्या(चौथे शिवाजी महाराज) पत्नी आनंदीबाईसाहेबांनी यशवंतराव या जयसिंगराव उर्फ आबासाहेबांच्या मुलाला दत्तक घेण्याचा संकल्प केला.
यशवंतराव हे महाराष्ट्रातील एका प्रसिध्द व जुन्या मराठा सरदार घराण्याचे वंशज असुन श्री छत्रपती शिवाजी महाराज उर्फ बाबासाहेब महाराज यांच्या द्वितीय भगिनी राजकन्या बाळाबाईसाहेब यांचे नातु होते. दत्तक विधीनंतर ते श्रीमंत छत्रपती शाहु महाराज बनले.
शाहु महाराज हे जन्माने राजपुत्र नव्हते व कोल्हापुरच्या गाधीचे वारसही नव्हते पण ते विचाराने आणि कर्माने मात्र स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसच होते.
शाहु महाराज हे भारतीय समाजाला त्यांचे मुलभुत हक्क आणि अधिकार, सामाजिक न्याय व सर्वांना समान संधी प्राप्त करुन देणारे एक थोर राष्ट्रपुरुषच होते. आजच्या आपल्या संविधानीय सरकारचे धेय्य समाजवादी समाजरचनेचे आहे. त्यामुळे छत्रपती शाहु महाराजांनी शोषित, दलित, कुणबी, कष्टकरी, बहुजन सामान्य जनतेच्या उध्दाराचे केलेले कार्य आजच्या सरकारला सुध्दा मार्गदर्शक ठरणारे आहे.
शाहु महाराजांनी स्वातंत्र्यपुर्व काळात केलेल्या शिक्षण, स्त्रीमुक्ती, जातीवाद निवारण, सामाजिक रुढी परंपराना छेद देत छात्रजगदगुरु पदाची केलेली निर्मिती, ब्राम्हणेत्तर चळवळ व त्यामागची त्यांची भुमिका यावरुन त्यावेळी पडलेले पडसाद आणि प्रस्थापित धर्मव्यवस्थेत, वर्णव्यवस्थेत, व जातीव्यवस्थेत प्रचलित असलेल्या सामाजिक वाईट प्रथांना छेद देणारे केलेले कार्य म्हणजेच त्याकाळात सामाजिक परीवर्तनासाठी तळमळीने केलेला प्रयत्नच होता.
रयतेसाठी आपले आयुष्य आहे, हीच त्यांची धारणा होती व या धारणेच्या पुर्तीसाठी त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि प्रशासकीय जीवनात पायाभुत कार्य केले हे व्यापक व सर्वसमावेशक कार्य होते. अंगावर राजवस्त्रे असली तरी त्याचा त्यांना दिमाख नव्हता त्याचा त्यांनी कधीही बडेजावही माजवला नाही त्यामुळे राजर्षी शाहु महाराज म्हणजे सर्वसामान्यांचे राजे होते, ते लोकांचे राजे होते.
छत्रपती झाल्यानंतर सर्वात अगोदर महाराजांनी आपल्या संस्थानात जिथपर्यंत आपलं राज्यं आहे तिथपर्यंत प्रत्यक्ष लोकांत जाऊन फेरफटका मारला आणि त्यांच्या समस्या जाणुन घेवून नंतरच आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केली. त्याकाळी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव प्रचंड प्रमाणात होता.
एकदा महाराज दिल्लीला गेले होते नेमकं तेंव्हाच गंगाराम कांबळे नावाच्या अस्पृश्य समाजातील व्यक्तीने मराठ्यांसाठी असलेल्या हौदाला स्पर्श केला. त्याकारणावरुन मराठ्यांनी कांबळेस रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला.
महाराज दिल्लीवरुन कोल्हापुरला परत येताच ही कहाणी त्यांच्या कानी पडली हे ऐकताच महाराज गोरेमोरे झाले, ज्यांनी मारलं त्या सर्वांची पाठ फोडुन काढली गेली. दोषींना शिक्षा करतांना मराठा जातीचा किंवा रक्त संबंधाचा भेद केला नाही. त्यातुन राजकीय नेतृत्व करतांना स्वजातीय लोकांच्या चुकावर पांघरुण घालायची नसते हा महान संदेश त्यांनी दिला.
शाहु महाराजांनी त्याकाळी पोलीस पाटलाकडुन अस्पृश्य समाजातील काही जातींना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जाती ठरवुन त्यांची दररोज घेतली जाणारी हजेरी कायमची बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महार, मांग, रामोशी, बेरड ह्या जातींना त्याचा फायदा झाला. त्यांची काम सोडुन व्यर्थ होणारी गैरसोय थांबली.
एवढेच काय तर याच्याही पुढे जाऊन महाराजांनी राज्यकर्ती जमात बना हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बहुजनांना केलेले आवाहन प्रत्यक्षात आणण्याचे महान कार्य केले जोपर्यंत राजकिय सत्तेत कमी-अधिक वाटा मिळणार नाही तोपर्यंत अस्पृश्यांचा सर्वांगिण विकास होणार नाही ही बाब महाराज जाणुन होते.
म्हणुनच म्युनिसिपलच्या चेअरमन पदी प्रथमच एका दत्तोबा पोवार नावाच्या अस्पृश्याची महाराजांच्या प्रेरणेने नेमणुक झाली. अशा प्रकारे अस्पृश्यांच्या राजकिय सहभागाची पायाभरणी महाराजांच्या कार्यकाळात झाली ही घटना त्याकाळी असाधारण होतीच पण हिंदुस्थानात ती प्रथमच घडली होती.
महाराजांच्या समताधिष्ठीत व्यक्तीमत्वाचे व गुणवैशिष्ट्याचे एक उदाहरण प्रा.नानासाहेब साळुंखे यांच्या पुस्तकातुन एका प्रसंगाद्वारे स्पष्ट करता येते, तो प्रसंग खालीलप्रमाणे…
हुबळीच्या एका परिषदेचे आग्रही निमंत्रण शाहु महाराजांना आले ते त्यांनी स्विकारले, ठरल्याप्रमाणे महाराज तेथे गेल्यावर हुबळीच्या जनतेने त्यांचे यथोचित स्वागत केले. महाराजांना कार्यक्रम स्थळी नेण्यासाठी एक रथ आणण्यात आला होता.
तेथील लोकांनी त्या रथाची घोडे सोडले व ती जनता स्वतः महाराजांचा रथ ओढु लागली त्यावर महाराज त्यांना म्हणाले “मी तुमच्या प्रेमापोटी रथातुन येत आहे पण जर रथ तुम्ही ओढणार असाल तर मी रथातुन खाली उतरुन पायी चालत येईल” यातून त्यांच सर्व समाजबांधवांवर असणारं प्रेम दिसून येत.
पण एवढ्यावरच न थांबता महाराज पुढे जे म्हणाले त्यातुन त्यांच्यातील व्यासंगी आणि अभ्यासु व्यक्तीमत्वाचा ठसा वाचकाच्या काळजाला हात घालणाराच आहे.
ते म्हणतात “आजपर्यंत तुम्हाला जनावाराप्रमाणे वागणुक मिळाली, तशीच जनावरे करावयास मी इथे आलो नाही तर जनावरानांही माणसे बनविण्याकरता आलो आहे.” (संदर्भ -शाहुंच्या आठवणी, लेखक-प्रा.नानासाहेब साळुंखे ,पान नं.७५ व ७६)
एकंदरीत कोल्हापुर संस्थान हे त्यांचे कार्यक्षेत्र असले तरी त्यांच्या चळवळीचे व विचाराचे प्रतिबिंब सबंध भारतात उमटले आहे. अश्या कर्त्या समाज सुधारकाच्या महान आणि तेजस्वी कार्याला मानाचा मुजरा आहे.
:- वैभव उत्तम जाधव
एम.ए.(राज्यशास्त्र)
रा.सोमठाणा ता.वसमत जि.हिंगोली
मो.७७९८०४६९६८
इ-मेल :- [email protected]
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..