शुभमन गिल: विश्वचषक 2023 मधील भारतीय संघाचा तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध दोन हात करण्यासाठी भारतीय संघ देखील सज्ज झाला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना उद्या दुपारी दोन वाजता सुरू होईल. उद्या दोन्ही संघ विजयाची हॅट्रिक लागावण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येते. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक गुड न्यूज मिळाली आहे. युवा तडफदार फलंदाज शुभमन गिल हा आजारातून सावरला असून त्याने सरावाला देखील सुरुवात केली आहे.
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी गिलला डेंगूच्या आजाराची लागण झाली होती. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे तो चेन्नई येथे उपचार घेत होता. त्यामुळे तो विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. त्याच्याऐवजी ‘ईशान किशन’ हा सलामीला रोहित शर्मा सोबत खेळत होता. मात्र ईशान किशनला पहिल्या दोन सामन्यात छाप सोडता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही तर दुसऱ्या सामन्यात त्याने 47 धावांची खेळी केली होती. गिल अंतिम 11 जणांच्या संघात खेळल्यास ईशान किशनची सुट्टी होईल. गिल उद्याचा सामना खेळणार की नाही याबाबत अद्यापही कोणतीही माहिती आली नसली तरी, त्याने सरावाला सुरुवात केली आहे.
गिलच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर बुधवारी तो विमानाने अहमदाबाद येथे दाखल झाला. शनिवारी पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी त्याने गुरवार पासून सरावाला कसून सुरुवात देखील केली आहे. टीम इंडिया मध्ये कमबॅक केल्याने सलामीवीरची चिंता कमी होईल.
नरेंद्र मोदी स्टेडियम आहे शुभमन गिलचे होम ग्राउंड.
आयपीएल मध्ये शुभमन गुजरात संघाकडून खेळतो. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे त्याचे होम ग्राउंड आहे. या मैदानावर त्याने आतापर्यंत एकूण 12 सामने खेळला आहे. त्यात त्याने 12 डावात 66.90 च्या सरासरीने 669 धावा कुटल्या आहेत. यात दोन खणखणीत शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 129 धावांची सर्वोच्च खेळी याच मैदानावर खेळला आहे. याच मैदानावर त्याने 60 चौकार आणि 25 उत्तुंग षटकार ठोकले आहेत.
अहमदाबादच्या स्टेडियमवर गिलने आतापर्यंत कोणताही आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला नाही. मात्र न्यूझीलंड विरुद्ध त्याने एकमेव T20 सामना खेळला असून या त्याने 126 धावांची धुवाधार शतकी खेळी केली आहे. पाकिस्तान विरुद्ध आतापर्यंत त्याने केवळ दोनच सामने खेळला आहे. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.
गिलची ही आकडेवारी पाकिस्तानच्या संघाला नक्कीच धडकी भरवणारी आहे. या सामन्यात त्याची बॅट तळपली तर भारताला विजयापासून कोणीच रोखू शकणार नाही तसेच विश्वचषकात भारत अपराजित राहील.
2023 या वर्षात भारताकडून सर्वाधिक धावा करण्यात गिल पहिल्या स्थानावर आहे. तसेच आयसीसी वनडे क्रमवारीत गिल दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. दोघांमध्ये केवळ पाच गुणांचा फरक आहे. गिल चा परफॉर्मन्स कायम राहिला तर बाबर आझमला तो नक्कीच पाठीमागे टाकून आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेऊ शकतो. आता उद्या होणाऱ्या सामन्यात गिल प्लेईंग 11 चा हिस्सा असेल का नाही? हे उद्याच समजेल आणि जर गिल हा सामना खेळला तर तो नक्कीच पाकिस्तान विरुद्ध एक मोठी विजयी खेळी खेळू शकतो. हा सामना उद्या नरेंद्रमोदी स्टेडियमवर दुपारी 2वाजता पासून सुरु होईल.
हेही वाचा:
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..