न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील 32 वा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात न्यूझीलंडचा 190धावांनी पराभव करत एकतर्फे विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघ विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत टॉपवर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 357 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 35.3 षटकात 167 धावांवर आटोपला.
न्यूझीलंडने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कर्णधार टेंबा बावूमा हा 24 धावांवर परतला. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रासी व्हॅन डूर डूसेन यांनी आक्रमक फटकेबाजी करत शतकी खेळी साकारले.
क्विंटन डिकॉकने या विश्वचषक स्पर्धेतले त्याचे चौथे शतक ठोकले. त्याने 116 चेंडूत 104 धावा काढल्या. या दहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भारत देशातले हे त्याचे सहावे आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधले 22 वे शतक ठरले. रासी वैन डूर डुसेन ने 118 चेंडूत 133 धावांची तुफानी शतके खेळी केली. यात नऊ चौकार आणि पाच मोठ्या षटकारांचा समावेश होता. शेवटच्या काही षटकात मिलरने 53 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. न्यूझीलंडच्या संघाकडून वेगवान गोलंदाज टीम साउदी याला दोन गडी बात करण्यात यश आले.
धावांचा पाठलाग करत असताना न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचा टॉप ऑर्डर हा पत्त्यांसारखा वेगवान आणि फिरकी गोलंदाजीपुढे गडगडून गेला. किवी संघाचे सहा फलंदाज अवघ्या 100 धावांवर माघारी परतले होते. विल यंग व ग्लेन फिलिप्स वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना छाप सोडता आली नाही. ग्लेन फिलिप्स यांनी 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण ती किवी संघाच्या विजयाच्या कामी आली नाही. कॉनवे 2, विल यंग 33, रचीन रवींद्र 9, मिचल याने 24 धावांचे योगदान दिले. टॉम लेथम हा चार धावांचे योगदान देऊन माघारी परतला.
किवी फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज यांच्या फिरकी जाळ्यात अडकून पडले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने चार महत्त्वपूर्ण विकेट घेतले तर मार्को यान्सन याने 3, कोएट्जी याला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेचे सात सामन्यात सहा विजयासह बारा गुण झाले आहेत. गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आता टॉपवर पोहोचला आहे तर न्यूझीलंडचा संघ सात पैकी चार सामने जिंकत आठ गुणांसह चौथा स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या या पराभवाचा ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या संघांना खूप मदत ठरणार आहे.