सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने मार्च २०२१ रोजी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. अवघ्या काही महिन्यांमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने टी -२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक विक्रम मोडले आहेत. तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात देखील त्याने एका मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे.
सूर्यकुमार यादवला तिसऱ्या वनडे सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो ९ चेंडूंमध्ये १४ धावा करत माघारी परतला. या छोट्या खेळी दरम्यान त्याने २ षटकार मारले. या षटकारांसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. सूर्यकुमार यादव हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
सूर्यकुमार यादव पूर्वी हा विक्रम, हार्दिक पंड्याच्या नावे होता. हार्दिक पंड्याने १०१ डावांमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. तर सूर्यकुमार यादवने हा भीम पराक्रम केवळ ६१ डावांमध्ये केला आहे. तसेच तो १०० पेक्षा कमी डावांमध्ये १०० षटकार मारणारा भारतीय फलंदाज देखील ठरला आहे.
तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. एमएस धोनीने १३२ डावांमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम केला होता. तर भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने हा पराक्रम १६६ डावांमध्ये केला होता.