सूर्यकुमार यादवची टी -२० क्रिकेटमध्ये गरुडझेप! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी अन् सुरेश रैनाला सोडलं मागे..
surykumar yadav breaks the record of ms dhoni and suresh raina

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने तुफान फटकेबाजी करत भारतीय संघाला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्याकडे अशी क्षमता आहे की,तो कुठल्याही गोलंदाजाविरुध्द खेळताना तुफान फटकेबाजी करू शकतो. दरम्यान न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पहिल्या टी -२० सामन्यात त्याने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
पहिल्या टी -२० सामन्यात बनवला हा विक्रम..
न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पहिल्या टी -२० सामन्यात भारतीय संघाला १७७ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीवीर फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधार हार्दिक पंड्या सोबत मिळून डाव सावरला. त्याने ३४ चेंडूंमध्ये ४७ धावांची खेळी केली. तो अर्धशतक पूर्ण करण्याआधीच माघारी परतला. तसेच त्याला भारतीय संघाला विजय देखील मिळवून देता आला नाही.
मात्र या खेळीसह त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत एमएस धोनी आणि सुरेश रैनाला मागे सोडलं आहे.
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..
विराट कोहली – ४००८ धावा
रोहित शर्मा – ३८५३ धावा
केएल राहुल – २२६५ धावा
शिखर धवन – १७५९ धावा
सूर्यकुमार यादव – १६२५ धावा
एमएस धोनी – १६१७ धावा
सुरेश रैना – १६०५ धावा