आयसीसी 2023 विश्वचषक स्पर्धा आता निम्म्यावर आली आहे. प्रत्येक सामन्यात फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला आहे. दुसरीकडे गोलंदाजदेखील फलंदाजांना आपल्या घातक गोलंदाजीने चोख उत्तर देत आहेत. नुकतेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदी याने कमी सामन्यात 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. कमी डावात विकेट शतक पूर्ण करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीवर एक नजर टाकूया.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम नेपाळचा वेगवान गोलंदाज संदीप लामिनछणे याच्या नावे आहे. संदीपने सर्वात कमी 42 डावात 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. जागतिक क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज गोलंदाज होऊन गेले. मात्र त्यांना हा विक्रम करता आला नाही. नेपाळसारख्या छोट्या देशातून पुढे येऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम प्रस्थापित करणे ही मोठी गोष्ट आहे.
सर्वात कमी डावामध्ये विकेटचे शतक पूर्ण करण्याचा विक्रम करण्याऱ्या गोलंदाजाच्या यादीमध्ये अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान दुसऱ्या स्थानावर आहे. राशीदने 44 सामन्यात शंभर विकेट घेतले होते. जगातल्या भल्या-भल्या फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीवर नाचवणारा राशीद अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघातला प्रमुख गोलंदाज आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदी याने 51 सामन्यात विकेटचे शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यंदाच्या वर्षात पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अवघ्या 52 डावात 100 विकेट घेतले आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याची गोलंदाजी साधारण राहिली आहे.
पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपट्टू सकलेन मुश्ताक याने 53 वनडे सामन्यात विकेटचे शतक पूर्ण केले. गेल्या अनेक वर्षापासून त्याचा हा विक्रम अबाधित होता. कमी डावात शंभर विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो तिसरा फिरकीपटू आहे.
बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफाजूर रहमान आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड यांनी प्रत्येकी 54 सामन्यात 100 विकेट घेतले आहेत. यंदाच्या स्पर्धेत तो विकेट घेण्यासाठी तरसत होता.
जगातला सगळ्यात वेगवान गोलंदाज मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने 55 सामन्यात 100 विकेट घेतले होते. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद या दोघांनी प्रत्येकी 56 सामन्यात 100 विकेट घेतले होते. या विश्वचषक स्पर्धेमध्ये मोहम्मद शमीने दोन सामन्यात सर्वांना चकित करणारी कामगिरी केली आहे. या बहारदार कामगिरीमुळे मागील सामन्यात भारताने इंग्लंडवर अविश्वसनीय विजय मिळवला होता.