ट्रॅव्हिस हेडने पदार्पणात ठोकले शतक; अशी कामगिरी करणारा बनला ऑस्ट्रेलियाचा पाचवा खेळाडू

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये शनिवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड ने विश्वचषकातील पदार्पणच्या सामन्यातच विक्रम केला. न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात त्याने धमाकेदार शतकी खेळी केली. विश्वचषक स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा तो ऑस्ट्रेलियाचा पाचवा खेळाडू ठरला आहे. हेडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे.

तसेच पदार्पणच्या सामन्यातील विश्वचषक स्पर्धेतले हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. हेडने 59 चेंडू 10 चौकार आणि सहा षटकाराच्या साह्याने दमदार शतक पूर्ण केले. सामनात त्याने 67 चेंडूत 109 धावांची विक्रमी खेळी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 एवढ्या धावांचा डोंगर रचला आहे. सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यात यश मिळाले. सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आणि ट्रॅव्हिस हेड यांनी केलेल्या 175 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा यंदाच्या विश्वचषकात एक मजबूत धावसंख्या उभारण्यात यश मिळाले. या भागीदारीमध्ये डेव्हिड वॉर्नर याने 65 चेंडूत 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

1983 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेवर चॅपल याने भारताविरुद्ध खेळताना 110 धावांची खेळी केली होती. विश्वचषक स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर 4 वर्षांनी 1987 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्युझीलँडविरुद्ध करताना जेफ मार्श यांनी 110 धावांची नाबाद खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाचा माजी दिवंगत अष्टपैलू खेळाडू अँड्रू सायमंड्स याच्या नावावर देखील एक विक्रम आहे. 2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळताना 143 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जीवावर ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात विजय मिळवला होता. विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा तो चौथा खेळाडू ठरला.

2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सलामीचा फलंदाज ॲरॉन फिंच याने इंग्लंड विरुद्ध खेळताना 135 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्याच्या या शतकी खेळाच्या जोरावर हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.