IND vs NZ: ‘चेसमास्टर’ विराट कोहलीच्या नावे नव्या विक्रमाची नोंद: श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला टाकले मागे

विश्वचषक 2023 मध्ये ‘चेसमास्टर’ विराट कोहली खोऱ्याने धावा काढत आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 104 चेंडू 95 धावा काढत न्यूझीलंडच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेतला. त्याच्या या खेळावरून असेच दिसते की, त्याने भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्याचा जणू विडाच उचलला आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात अमूल्य असे योगदान देणाऱ्या विराटने आणखीन एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

विराट कोहली

विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेतील 5 सामन्यात एक दमदार शतक आणि तीन अर्धशतकाच्या साह्याने 354 धावा काढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत सध्या तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधल्या 49 शतकांच्या विक्रमांच्या तो जवळपास पोहचला आहे. सचिनचा हा विक्रम देखील तो या स्पर्धेत मोडला असता, पण ती संधी हुकली. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात 85 धावा आणि काल न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो 95 धावांवर बाद झाला.

या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराटने क्रिकेटमध्ये 26 हजार धावांचा टप्पा देखील ओलांडला आहे. तसेच त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या याला देखील पाठीमागे टाकले आहे. जयसूर्याने वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार 430 धावा केल्या आहेत. तो आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. विराटच्या नावावर आता 13 हजार 437 धावांची नोंद आहे. या यादीत विराटने चौथा स्थानी झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याने वनडे क्रिकेटमध्ये 13704 धावा काढत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. पॉंटिंगचा हा विक्रम मोडीत करण्यासाठी विराट कोहलीला अजून 267 धावा काढण्याची गरज आहे. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता पॉंटिंगचा हा विक्रम जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही. कुमार संघकारा हा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने वन डे क्रिकेटमध्ये 14,234 धावा काढल्या आहेत. कुमारचा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून 797 धावांची गरज आहे.

IND vs NZ: 'चेसमास्टर' विराट कोहलीच्या नावे नव्या विक्रमाची नोंद: श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला टाकले मागे

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने 18, 426 विक्रमी धावा काढल्या आहेत. हा विक्रम मोडीत काढण्यासाठी विराटला अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पुढचा सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध होणार आहे इंग्लंड विरुद्ध विराट कोहलीची कामगिरी जबरदस्त आहे त्यामुळे याही सामन्यात तो चमत्कार करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पडणाऱ्या विराटसाठी यंदाचे वर्ष लकी ठरले आहे.


हेही वाचा: