धर्मशालाच्या मैदानावरती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रंगतदार सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 एवढ्या धावांचा डोंगर रचला आहे. सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यात यश मिळाले. सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आणि ट्रॅव्हिस हेड यांनी केलेल्या 175 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा यंदाच्या विश्वचषकात एक मजबूत धावसंख्या उभारण्यात यश मिळाले.
या भागीदारीमध्ये डेव्हिड वॉर्नर याने 65 चेंडूत 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीसह त्याने एक आणखीन एक विक्रम त्याच्या नावावर केला आहे. वॉर्नर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत शानदार फॉर्मत आहे. विश्वचषक स्पर्धेतील 6 सामन्यात त्याने 413 धावा केल्या आहेत. तसेच यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यासह त्याच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत एकूण 1405 धावा झाल्या आहेत. केवळ 24 सामन्यात त्याने या धावा केल्या आहेत. विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा विराटचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. विराटने 31 सामन्यात 1384 धावा काढले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
डेविड वॉर्नर प्रत्येक सामन्यात गोलंदाजांची धुलाई करत आहे. ऑस्ट्रेलियाकडून तो सतत धावा करतोय. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना पहिल्या तीन सामन्यात त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे तीन पैकी पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. वॉर्नरच्या बॅटमधून धावाचा पाऊस पडायला लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी रथावर पुन्हा परतला. त्याने पाकिस्तान विरुद्ध खेळताना 163 धावा नेदरलँड विरुद्ध खेळताना 104 तर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 81 धावा काढल्या आहेत. त्याचा परतलेला फॉर्म हा विरोधी संघासाठी धोक्याची घंटा आहे. येणाऱ्या सामन्यात देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा ऑस्ट्रेलिया करत आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी
सचिन तेंडुलकर – 2278धावा (45सामने)
रिकी पाँटिंग – 1743धावा (46सामने)
कुमार संगकर – 1532 धावा (37सामने)
डेव्हिड वॉर्नर – 1405धावा (24सामने)
विराट कोहली – 1384 धावा (31 सामने)