संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी भारतीय संघात जागा मिळालेला ‘जितेश शर्मा’ नक्की कोण आहे? 2022 च्या मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फलंदाजीने घातला होता धुमाकूळ..
श्रीलंका संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. ज्यात भारत आणि श्रीलंका याच्यातील टी-२० सामन्याची मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना भारतीय संघाने 2 धावांनी जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या सामन्याच्या आधीच भारतीय संघाचा स्टार खेळाडू जखमी होऊन संघातून बाहेर पडला.
संजू सॅमसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी विदर्भ आणि पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.
जितेशला पहिल्यांदाच भारतीय संघात सामील होण्याची संधी मिळाली. गुरुवारी सकाळपर्यंत तो पुण्यात संघात दाखल होण्याची शक्यता आहे.
“पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सीमारेषेजवळ चेंडू थांबवताना सॅमसनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याला स्कॅन आणि तज्ञ डॉक्टरांच्या मतासाठी आज दुपारी मुंबईला घेऊन जाईल,” असे बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विश्रांती आणि पुनर्वसनाचा सल्ला देण्यात आला आहे.”
View this post on Instagram
श्रीलंकेच्या डावातील 13व्या षटकात सॅमसनला दुखापत झाल्याचे मानले जात आहे. थर्ड मॅन लाइनच्या खाली सरकणारा चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात त्याचा गुडघा टर्फवर पकडला गेला असावा. या घटनेनंतर सॅमसन लगेच मैदान सोडून गेला होता.
सॅमसनसाठी हा सामना जवळजवळ विसरण्यासारखा होता. त्याने फलंदाजीत निराशाजनक कामगिरी करत अवघ्या दोन धावा केल्या. यानंतर क्षेत्ररक्षण करताना त्याने पहिल्याच षटकात पथुम निसांकाचा झेलही सोडला.
सॅमसन पहिल्या सामन्यात कीपिंग करत नव्हता. जितेशला इशान किशनचे कव्हर म्हणून भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये जितेशने पंजाब किंग्जकडून चांगली कामगिरी केली होती. त्यादरम्यान त्याने 12 सामन्यात 163 च्या स्ट्राईक रेटने 234 धावा केल्या. तो बहुतांशी पंजाब संघात फिनिशर म्हणून खेळला. त्याला आयपीएल 2023 साठी पंजाबनेही कायम ठेवले आहे.

जितेशने 2022 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भासाठी 175.00 च्या स्ट्राइक रेटने 10 सामन्यांत 224 धावा करत चमकदार कामगिरी केली.
सॅमसनच्या दुखापतीमुळे राहुल त्रिपाठीला त्याच्या घरच्या मैदानावर पदार्पणाची संधी मिळू शकते. राहुल गेल्या काही काळापासून भारतीय संघासोबत आहे पण आतापर्यंत त्याने एकही सामना खेळलेला नाही.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे.