इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळणार की नाही? वाचा काय सांगतो मेडिकल रिपोर्ट

आयपीएल 2023 मध्ये भारताचा पुढचा सामना इंग्लंड विरुद्ध लखनऊच्या मैदानावर 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी पुन्हा एकदा भारतीय संघाला एक झटका बसला आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा अद्याप फिट नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.

बंगळूर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये डॉक्टरांची वैद्यकीय स्पेशलिस्ट टीम त्याच्यावर नजर ठेवून आहे. पंड्याला झालेली ही दुखापत गंभीर नसली तरी भारतीय संघ कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. पंड्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासोबतच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला ही मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1 नोव्हेंबर रोजी भारताचा सामना श्रीलंके विरुद्ध होणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आणि 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मात्र तो उपलब्ध असेल, अशी माहिती समोर आली आहे.

बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना लिटन दासचा स्ट्रेट ड्राईव्ह अडवताना चेंडू पंड्याच्या पायाला लागला. त्याला दुखापत झाल्याने भर सामन्यात मैदान सोडावे लागले. त्याचे उर्वरित षटक पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माने विराट कोहलीच्या हाती चेंडू सोपवला. त्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी ही मुकला. त्याचीही दुखापत गंभीर नसली तरी भारतीय संघ व्यवस्थापन महत्त्वाच्या सामन्यासाठी तो उपलब्ध राहावा, यासाठी त्याला लवकर खेळवण्याची घाई करत नाहीत.

हार्दिक पंड्या अनफिट असल्यामुळे भारतीय संघात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दोन बदल करण्यात आले. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या ऐवजी मोहम्मद शमी तर हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली. सूर्याला या सामन्यात आपली चमक दाखवता आली नाही. तो अवघ्या दोन धावातच माघारी परतला तर मोहम्मद शमी याने पहिल्याच सामन्यात 5 बळी घेत विश्वचषक स्पर्धेत दमदार सुरुवात करून दाखवली.

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताच बदल होण्याची शक्यता कमी आहे. कारण शार्दुल ठाकूरचा फ्लॉप शो या स्पर्धेत सुरू आहे. त्याला विश्वचषकातील तीन सामन्यात केवळ दोनच बळी मिळवता आले. शार्दुलचा हा परफॉर्मन्स पाहता रोहित शर्मा त्याला पुढील सामन्यात खेळवेल याची शक्यता फारच कमी आहे. भारतीय संघाने विश्वचषकातील आपले पहिले पाच सामने जिंकून  गुणतालिकेवर अव्वल स्थान पटकावले आहे.