आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने सहापैकी दोनच सामन्यात विजय मिळवले आहेत. सततच्या होणाऱ्या पराभवामुळे आणि निराशाजनक कामगिरीमुळे संघ सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी सध्याचे दिवस फार वाईट सुरू आहेत. यातच भर म्हणून आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष इंजमाम उल हक यांनी सोमवारी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
पीसीबीचे अध्यक्ष जका अश्रफ यांनी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मुख्य निवडकर्ता म्हणून इंझमामचा करार संपल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढू शकतात. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंझमामला सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही आणि त्याच्या राजीनाम्यानंतर बोर्डाला त्याला 1.5 कोटी पाकिस्तानी रुपये द्यावे लागतील. इंझमामचा मासिक पगार 25 लाख पाकिस्तानी रुपये होता.
जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, इंझमाम उल हक हे याझो इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये शेअरहोल्डर आहेत. ही कंपनी अनेक क्रिकेटपटूंचे एजंट तल्हा रहमानी यांच्या मालकीची आहे. ही कंपनी बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंचे प्रतिनिधित्व करते. खेळाडूंच्या वेतनाबाबत सुरू असलेल्या वादात इंझमामच्या सहभागावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
इंझमाम उल हक यांच्या राजीनाम्यामागे हेही कारण असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पीसीबीने इंजमाम उल हक आणि प्लेयर एजंट कंपनी यांची चौकशी करण्यासाठी एका समितीची निर्मिती केली आहे. समितीमध्ये पाच जणांचा समावेश आहे. पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रँड ब्रँडबर्न यांनी सोमवारी पाकिस्तानच्या खेळाडूंवर लावलेले आरोप चुकीच्या असल्याचे सांगत पाठराखण केली.
माजी खेळाडू इंजमाम उल हक हे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून 2016 पासून काम पाहत आहेत. ऑगस्ट 2016 ते जुलै 2019 पर्यंत त्यांचा कार्यकाल होता. त्यानंतर पुन्हा त्यांना आशिया कप 2023 स्पर्धेच्या वेळी वाढीव कालावधी मिळाला आहे.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत पीसीबी आणि खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेक खुलासे झाले. त्यानंतर गदारोळ सुरू झाला. 2023च्या विश्वचषकापूर्वी वाद तीव्रतेच्या शिखरावर पोहोचला. खेळाडूंनी हाय-प्रोफाइल स्पर्धेदरम्यान बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. पीसीबीला आयसीसीकडून मिळणाऱ्या पैशाचा काही भागही त्याला देण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.