भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) 34वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने आत्तापर्यंत 10 वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4 विकेट घेतल्या आहेत. यातील पहिली विकेट तर त्याने वाईड टाकलेल्या चेंडूवर घेतली होती. त्यामुळे त्याचा हा चेंडू त्या षटकामध्ये गणला गेला नव्हता. पण विकेट मात्र विराटला मिळाली होती. तीही इंग्लंडचा दिग्गज फलंदाज केविन पीटरसनची.
झाले असे की भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे टी20 31 ऑगस्ट 2011 ला एकमेव टी20 सामना खेळत होता. या सामन्यात रहाणेने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 165 धावा केल्या होत्या आणि इंग्लंड समोर विजयासाठी 166 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 78 चेंडूत 110 धावांची गरज असताना पीटरसन आणि इयान मॉर्गन फलंदाजी करत होते. यावेळी भारताचा त्यावेळीचा कर्णधार एमएस धोनीने विराटकडे चेंडू सोपवला.
विराटने त्याच्य़ा कारकिर्दीतील हा पहिलाच चेंडू वाईड टाकला. पण यष्टीमागे चपळ असणाऱ्या धोनीने विराटने लेग साइडला टाकलेला हा चेंडू पकडत पीटरसनला यष्टीचीत केले. त्यामुळे विराटला त्याची पहिली विकेटही मिळाली. क्रिकेटमध्ये वाइड चेंडूवर फलंदाजाला बाद दोन प्रकारे करता येते, एक म्हणजे यष्टीचीत आणि दुसरा पर्याय म्हणजे हिट विकेट.
त्यावेळी कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये गोलंदाजीतील कारकिर्द वाईड चेंडूवर विकेट घेत सुरु केली. त्या चेंडूनंतर त्याच्या नावापुढे त्याचे गोलंदाजी आकडे 0.0-0-0-1 असे दिसत होते. या चेंडूनंतर विराटने त्या षटकात तीन धावा दिल्या. या सामन्यात इंग्लंडने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.