भारताचा चेसमास्टर विराट कोहली याची बॅट 2023 विश्वचषकात पूर्णतः रंगात दिसून येत आहे. प्रत्येक सामन्यात तो धावांचा पाऊस पडतोय. त्याच्या खेळीमुळेच भारतीय संघाने सलग सहा सामने जिंकले आहे. आज भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू आहे. मुंबईच्या मैदानावर विराटने पुन्हा एकदा विक्रम रचला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा 1000 धावा काढणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहली ने हा कारनामा 8 वेळा केला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक कॅलेंडर वर्षात सात वेळा हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढण्याचा विक्रम आज विराट कोहलीने मोडीत काढला. विराट कोहलीला सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी तब्बल बारा वर्षे लागले. विराट कोहलीने 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019 आणि 2023 या कॅलेंडर वर्षात 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 1994, 1996, 1997, 1998, 2003 व 2007 या कॅलेंडर वर्षात त्यांनी हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संघकारा, रिकी पॉंटिंग व सौरव गांगुली यांनी प्रत्येकी सहा वेळा 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा एका कॅलेंडर वर्षात केल्या आहेत. भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याने पाच वेळा 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि तिलकरत्न दिलशान यांनी प्रत्येकी 4 वेळा हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याची नोंद आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आशियाई देशांमध्ये 8 हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, कुमार संघकारा यांनी केला होता. आशियाई देशांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर टॉपवर असून त्याने 12067 धावा केल्या आहेत.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात करत रोहित शर्माला अवघ्या चार धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर गिल आणि कोहली यांनी भारताचा डाव सांभाळला दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. गिल 92 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने आपली विकेट गमावली आजही त्याला शतक पूर्ण करता आले नाही. तो 94 चेंडूत 88 धावा काढून बाद झाला. यात 11 चौकारांचा समावेश होता.