दोन दशकाचा इतिहास बदलवण्यासाठी भारतीय संघ सज्ज! रविवारी होणार इंग्लंड विरुद्ध सामना.

0

आयसीसी 2023 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून सेमी फायनलच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारताचा पुढचा सामना 29 ऑक्टोबर रोजी लखनऊच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडच्या संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. असे असले तरी गतविजेता इंग्लंडचा संघ गेल्या 20 वर्षापासून विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना अपराजित आहे.

 

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी देखील भारतीय संघ गेल्या 20 वर्षात विश्वचषक स्पर्धेत एकदाही हरवू शकला नाही. मात्र 2023 च्या स्पर्धेत भारतीय संघाने हा इतिहास बदलून टाकला. न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मागील वर्षे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताचा 39 धावांनी पराभूत केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघाकडे संधी आहे.

 

2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर भारत इंग्लंडला विश्वचषक एकदाही हरवू शकला नाही. 2007 च्या आणि 2015 च्या विश्वचषकात दोन्ही संघात सामने झाले नाहीत. 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघाचा सामना झाला. मात्र हा सामना टाय झाला. 2019 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताला पराभूत केले होते.

 

भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण आठ सामने झाले आहेत. त्यात 3 सामन्यात भारताला विजय मिळवला तर इंग्लंडने 4 सामन्यात बाजी मारली तर एकाच सामन्याचा निकाल लागला नाही. विश्वचषकातील आकडे जरी इंग्लंडच्या बाजूने असले तरी सध्या मात्र भारतीय संघ तुफान फार्मात आहे. त्यामुळे भारताच्या विजयाचा रथ रोखणे इंग्लंडला नाकी नऊ येणार आहे.

 

गतविजेता असलेल्या इंग्लंडच्या संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी नावाला लौकिक अशी कामगिरी केली नाही. यंदाच्या स्पर्धेत इंग्लंडचे चार सामने झाले असून त्यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. एका विजयासह दोन गुण मिळवत ते आठव्या स्थानावर आहेत. आज गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी इंग्लंडचचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला तर इंग्लंड स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो. त्यामुळे इंग्लंडसाठी आजचा सामना करा किंवा मरा अशा स्थितीतला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.