लंका दहन: सेमी फायनलमध्ये रोहितच्या सेनेची धडाकेबाज एन्ट्री; भारताचा 302 धावांनी मोठा विजय

0

भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर 302 धावांनी मोठा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने लंकेपुढे 358 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र डोंगराएवढ्या दिलेल्या आव्हान पुढे श्रीलंकेचा डाव 19.4 षटकात 55 धावांवर आटोपला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 18 धावा देत सर्वाधिक पाच गडी बाद केले. तो विजयाचा खरा नायक ठरला.

 

भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेतला 33वा सामना झाला.श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मधुशंका याने रोहित शर्माला चार धावांवर बाद करत लंकेला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर गिल आणि विराट कोहली सामन्याची सूत्रे हाती घेत लंकेच्या गोलंदाजाची शाळाच घेतली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी रचली. यात गिलने 92 धावा काढल्या तर विराट कोहली 88 धावा काढून बाद झाला. दोघेही वेगात शतक करण्याच्या नादात बाद झाले. त्यानंतर मधल्या फळीत आलेल्या श्रेयश अय्यरनेदेखील धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने अवघ्या 56 चेंडूत 82 धावांची धमाकेदार खेळी करत भारताची धावसंख्या 300 च्या पुढे नेला. भारताने 50 षटकात आठ बाद 357 धावा केल्या. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मधुशंका याने 80 धावा देत पाच गडी बाद केले.

 

प्रत्युत्तरात 358 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या लंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराह याने पहिल्याच चेंडूवर पथूम निसंका याला शून्य धावसंख्येवर बाद केले. त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराज याने देखील श्रीलंकेच्या सलामीच्या फलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यानेही झटपट तीन गडी बाद केले. लंकचे तीन धावांवर चार फलंदाज माघारी परतले होते. बुमराह आणि सिराज नंतर मोहम्मद शमी गोलंदाजीला आल्यानंतर त्याने पहिल्या षटकात दोन गडी बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले.

 

लंकेच्या पाच फलंदाजांना भोपळा देखील फोडता आला नाही. एंजलो मॅथ्यूज 12, महेश तिक्षणा 12 आणि रजिताने 14 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेच्या फलंदाजांनी या सामन्यात अत्यंत निराशा जनक कामगिरी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर मोहम्मद शमी याने 18 धावा देत पाच गडी बाद केले. मोहम्मद सिराजला 16 धावा तीन गडी बाद करण्यात यश मिळाले.

विश्वचषक 2023 स्पर्धेतला हा भारताचा सलग सातवा विजय आहे. या विजयासह भारताने सेमी फायनल मध्ये धडाकेबाज एन्ट्री केली आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचवणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.भारताने या विजयासह गुणतालिकेत 14 गुणांसह टॉप वर स्थान मिळवले आहे. भारताचा पुढचा सामना 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.