गोल्डन बॅटच्या रेसमध्ये विराट कोहली दुसऱ्या स्थानावर: दिलशान ने टाकले आफ्रिदीला मागे

0
2

आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेमधील 33 व्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत आणि श्रीलंका सामन्यानंतर गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलच्या यादीमध्ये बराच उलटफेअर घडून आला आहे. गोल्डन बॅटच्या रेस मध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकवर तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गोल्डन बॉलच्या रेस बाबतीत बोलायचे झाले तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका याने भारताविरुद्ध पाच विकेट घेत टॉप वर पोहोचला आहे. तर बुमराह हा टॉप फाईव्हमध्ये आहे तर मोहम्मद शमी हा सहाव्या स्थानावर आहे.

भारताची रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने कालच्या सामन्यात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली. त्याने 94 चेंडूत 88 धावा काढत अर्धशतकी खेळी केली. जोरदार फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. आणि त्याचे 49 वे शतक हुकले. विराटचे शतक हुकले तरी तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. 2023 विश्वचषक स्पर्धेत विराटने 88.40 च्या सरासरीने सात सामन्यात 442 धावा केल्या आहेत. यात एका दमदार शतकाचा तर चार अर्धशतकांचा समावेश आहे. श्रीलंके विरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहित शर्मा अवघ्या 4 धावा काढून माघारी परतला. त्याला या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. रोहितने सात सामन्यात एका शतकासह 402 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचीन रवींद्र याने 415 धावा केल्या आहेत. तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 413 धावा केल्या आहेत. तो चौथ्या क्रमांकावर आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा दिलशान मधुशंका याने 5 गडी बाद करत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याला पाठीमागे टाकत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले त्याने या स्पर्धेत सात सामन्यात 18 गडी बाद केले आहेत. शाहीन शहा आफ्रिदी याच्या नावावर सोळा विकेट घेतल्याची नोंद आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला काल एकमेव गडी बाद करता आला. तो या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 15 विकेटची नोंद आहे. भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या नावावर 14 विकेटची नोंद आहे. तो या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मोहम्मद शमीने केवळ तीनच सामन्यात 14 विकेट घेतले आहेत इतर सर्वच गोलंदाजांनी 7 सामने खेळले आहेत.

कालच्या सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर, भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर 302 धावांनी मोठा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने लंकेपुढे 358 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र डोंगराएवढ्या दिलेल्या आव्हान पुढे श्रीलंकेचा डाव 19.4 षटकात 55 धावांवर आटोपला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 18 धावा देत सर्वाधिक पाच गडी बाद केले. तो विजयाचा खरा नायक ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here