IND vs BAN: विश्वचषकात भारताचा विजयी चौकार: कोहलीचे विराट शतक; बांगलादेश झाला पराभूत

 

IND vs BAN :  आयसीसी विश्वचषक 2023 मधील 17 व्या सामन्यांमध्ये भारताने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे. बांगलादेशने भारतापुढे विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान विराट कोहलीच्या जबरदस्त शतकी खेळीच्या जोरावर 41.3 षटकात 261 धावात तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत हे पहिले शतक ठोकले आहे. तर विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचे हे दुसरे शतक ठरले.

सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशच्या सलामीच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून दिली. तानझिद हसन आणि लिटन दास यांनी 93 धावांची सलामी दिली.

तानजीत हसन कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 51 धावांची सुरेख खेळी केली. यात पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले. तर लिटन दास याने 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला जडेजाने बाद केले. त्याने सात चौकार ठोकले. मुस्तफिकूर रहीम याने 38 धावांचे योगदान दिले. महमदुल्ला याने शेवटच्या षटकात फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 46 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो बुमराहच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. भारताकडून सिराज, बुमराह, जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर कुलदीप यादवला एकमेव गडी बाद करता आला.

बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात भारताच्या सलामीच्या जोडीने तडाखेबाज सुरुवात केली. रोहित शर्माने सात चौकार व दोन षटकार ठोकत 40 चेंडूत 48 धावांची खेळी करून बाद झाला. शुभमन गिलने विश्वचषक स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने 55 चेंडू 53 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत पाच चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.

भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो विराट कोहली. कोहलीने एक दिवसीय क्रिकेटमधले त्याचे 48 वे शतक ठोकले. बांगलादेशच्या गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेत 97 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी केली. यात सहा चौकार तर चार अप्रतिम षटकारांचा समावेश होता.

विराट कोहलीने ठोकले विश्वचषक 2023 मधील पहिले शतक..

IND vs BAN: विश्वचषकात भारताचा विजयी चौकार: कोहलीचे विराट शतक; बांगलादेश झाला पराभूत

विराट शतकाच्या जवळ पोहोचला असताना बांगलादेशच्या खेळाडूंनी वाईड चेंडू टाकून त्याचे शतक न होऊ देण्याचा प्रयत्न करत होते अखेर विराटने पुढे येऊन सणसणीत षटकार ठोकून शतक साजरे केले. के एल राहुल याने 34 चेंडू 34 धावांचे योगदान देत शेवटपर्यंत नाबाद राहिला. भारतीय फलंदाजापुढे बांगलादेशचे गोलंदाज हताश झालेले दिसून आले.

बांगलादेशकडून मेहंदी मिराज याने 10 षटकात 47 धावा देत भारताचे दोन गडी बाद केले तर हसन मोहम्मद याने आठ षटकात 65 धावा देत एकमेव गडी बाद केला. बांगलादेश ने दिलेले 257 धावांचे आव्हान भारताने 41.3 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह भारताचे गुणतालिकेत आठ अंक झाले असून भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा चार सामन्यापैकी हा तिसरा पराभव आहे. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 22 ऑक्टोंबर रोजी रविवारी होणार आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *